नाशिक : राज्यात अनेक ठिकाणी लम्पी आजाराने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची जनावरे धोक्यात आली आहेत तर अतिवृष्टीचाही फटका बसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम स्थगित होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे.
जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे तर उर्वरित १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील लागलीच जाहीर झाला आहे. जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींचा कार्यक्रम राज्य आयोगाकडून जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतील ५, सुरगाण्यातील ६१, त्र्यंबकेश्वरमधील ५७, तर पेठ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
येत्या १३ तारखेला या संदर्भातील अधिसूचना जाहीर केली जाणार आहे, मात्र निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमाला ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे. राज्यात लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांची जनावरे धोक्यात आली आहेत. याबराबेरच शेतकऱ्यांच्या शेतीवर आणि दुग्ध उत्पादनावर देखील मोठा परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतपिकांची देखील चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अशा वातावरणात निवडणुका घेणे योग्य होणार नसल्याने राज्य शासनाकडून याबाबत फेरविचार सुरू असल्याचे समजते. त्यानुसार येत्या डिसेंबरपर्यंत या निवडणुकांचा कार्यक्रम डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे.