मनोज मालपाणी नाशिकरोड जेलरोड प्रभाग १७ मध्ये शिवसेना, भाजपामधील बंडखोर व नाराजांनी घेतलेली भूमिका एकीकडे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा आमने-सामने आल्याने प्रभाग रचना बदलूनही या प्रभागातील आपसातील चुरस मात्र कायम राहाणार आहे. जुन्या नव्यांच्या उमेदवारीमुळे दिग्गज आमने-सामने आहेत. प्रचाराचे अनेक मुद्द्ये रणधुमाळीत समोर येतीलही, परंतु ओळखीचा चेहरा हाच फॅक्टर येथे महत्त्वाचा ठरू शकतो. जुना प्रभाग ३२ पूर्ण व ३६ चा बहुतांश भाग व उपनगरचा काही परिसर असा मिळून नवीन प्रभाग १७ ची निर्मिती झाली आहे. यामध्ये कॅनॉलरोड झोपडपट्टी व दसक गावठाण वगळता उर्वरित सर्व परिसर सोसायटी, बंगले, कॉलन्यांचा परिसर आहे. याठिकाणी शिवसेनेचे दोन, रिपाइंचा एक व सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून आला आहे. शिवसेना, भाजपाकडे इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाल्यामुळे नाराजांची संख्यादेखील मोठी आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने चारही गटात उमेदवार उभे केले असले तरी कॉँग्रेसच्या गोटातून मात्र मित्रपक्ष असलेल्या पीपल्स रिपाइंचे उमेदवार देण्यात आले आहे. मनसेला ब- इतर मागासवर्ग महिला या गटात उमेदवार न मिळाल्याने त्यांचे पॅनल पूर्ण होऊ शकले नाही, तर बसपानेदेखील चारही गटांत उमेदवार उभे केले आहेत. रिपाइं आठवले गट या प्रभागात अ व ड मध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे.जेलरोड शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र गटा-तटाच्या राजकारणामुळे शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू आहे. ऐनवेळी आयात झालेल्या उमेदवारांमुळे भाजपा कार्यकर्त्यांत चांगलीच नाराजी आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने चारही गटात उमेदवारी दिली असली तरी पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते हे अद्याप सक्रिय न झाल्याने सध्या तरी उमेदवारच किल्ला लढवत आहे. अ-अनुसूचित जाती गटात भाजपाने युती तोडल्याने रिपाइंचे माजी नगरसेवक संजय भालेराव, पोट निवडणुकीत भाजपाकडून विजयी झालेल्या सुनंदा मोरे, आघाडीकडून शशिकांत उन्हवणे, बसपाचे नितीन चंद्रमोरे हे सर्व भीमनगर, कॅनॉलरोड या एकाच भागातील उमेदवार आहेत. मनसेकडून प्रमोद साखरे निवडणूक रिंगणात आहेत, तर शिवसेना प्रवेशाला पक्षांतर्गत तीव्र विरोध होऊनही ऐनवेळी शिवसेनेची उमेदवारी मिळविणारे प्रशांत दिवे व शिवसेना बंडखोर राहुल प्रकाश कोथमिरे यांची उमेदवारी आहे. यापूर्वी दिवे यांच्या मातोश्री या प्रभागातील काही भागांचे प्रतिनिधित्व केले आहे,. तर रिपाइंच्या संजय व ललिता भालेराव यांनीदेखील यामध्ये प्रतिनिधित्व केले आहे. तूर्तास तरी दिवे, मोरे, भालेराव, उन्हवणे अशी चौरंगी लढत होईल, असे दिसत आहे.ब - इतर मागासवर्ग महिला गटातून शिवसेनेच्या नगरसेवक मंगला आढाव, भाजपाच्या ज्योती जाधव, आघाडीकडून कमल जाधव व बसपाकडून विजयता डावरे हे उमेदवारी करत असून, मनसेला या गटात उमेदवारी नाही. आढाव यांचे पती स्वर्गीय प्रकाश आढाव यांनीदेखील यापूर्वी या भागांचे प्रतिनिधित्व केले आहे. आढाव यांनी केलेली कामे, नातेसंबंध ही त्यांच्या जमेची बाजू आहे, तर भाजपाच्या जाधव यांचा नवीन चेहरा आहे.क- सर्वसाधारण महिला गटात शिवसेनेकडून आशा अजित पवार, आघाडी कुंदा सहाणे, भाजपा सुमन सातभाई, मनसे शीतल अहिरे व शिवसेना बंडखोर योगिनी बाळासाहेब शेलार या उमेदवारी करत आहे. शिवसेनेत या गटात उमेदवारी न मिळाल्याने नाराजी आहे, तर भाजपाच्या सुमन सातभाई या सेनेचे नगरसेवक अशोक सातभाई यांच्या आप्तेष्ट आहेत. सेनेचे बंडखोर शेलार यांच्यामुळे येथे सेनेची डोकेदुखी वाढली आहे, तर आघाडीच्या कुंदा सहाणे या कार्यकर्त्या म्हणून परिचित आहे. शिवसेना, भाजपा, आघाडी अशी तिरंगी लढत होईल अशी सध्याची स्थिती आहे.
राजकीय पक्षापेक्षा चेहराच ठरणार प्रभावी
By admin | Published: February 10, 2017 12:38 AM