‘खैर’ तोडीचा तपास भरकटला; पथकाला लागेना तस्करांचा सुगावा
नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली; मात्र पंचनाम्यानंतर हे पथक भरकटले असून, अद्याप तस्करांचा सुगावा पथकाला लागलेला नाही. वृक्षांच्या कत्तलीमागे असलेल्या गुन्हेगारांची उपवनविभागाच्या अधिकाºयांकडून जणू ‘दक्षता’ घेतली जात असल्याची चर्चा सुरू आहे.मालेगाव तालुक्यातील गाळणा, नागझिरी, पोहाणे, चिंचवे, तळवाडे, रामपुरा या गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणात जंगलाचे क्षेत्र आहे. या जंगलातील वृक्षसंपदा धोक्यात आली असून, गुजरातच्या गुटखा व्यवसायाशी खैर वृक्षांची कत्तल करणाºया टोळीचा या धुमाकूळ वाढला आहे. टोळीने काही नागरिकांना व वन कर्मचाºयांना हाताशी धरून खैर इलेक्ट्रॉनिक कटरने कापल्याचे उघडकीस आले आहे. पन्नास, शंभर नव्हे तर तब्बल पाचशेपेक्षा अधिक खैरांची झाडे कापून गुजरातमध्ये पाठविली. या गुन्ह्याचा तपास दक्षता पथकाकडून गुरुवारपासून (दि. १२) सुरू आहे. पथकाने दोन दिवसांमध्ये पंचनामा पूर्ण केला आणि अहवाल तयार केला; मात्र या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे अशा तस्करांच्या मुसक्या आवळण्यात अद्याप यश आले नाही. याबाबत तपास भरकटला असून, अद्याप एकालाही या गुन्ह्यात ताब्यात घेतलेले नाही.कापलेले बुंधे वनकर्मचाºयांनी बुजविल्याचा संशयकापलेल्या खैराच्या झाडांचे जमिनीपासूनचे बुंधे माती टाकून वन कर्मचाºयांनीच बुजविल्याचा संशय आहे. पंचनामा सुरू असताना सदर प्रकार तपास पथकाच्या निदर्शनास आल्याचेही बोलले जात आहे. मात्र ‘आपलेच दात आपलेच ओठ’ या म्हणीनुसार सध्या वनविभागाची अवस्था झाली आहे.पंचनाम्याच्या अहवालानंतर अद्याप मुख्य वनसंरक्षकांकडूनदेखील कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई या प्रकरणी झाली नसून त्यांच्या कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.