नाशिक - नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेला गिधाड पक्षी जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ लागला आहे. जिल्ह्यातील हरसूलजवळ खोरीपाड्या या लहानशा गावात आदिवासींकडून वनविभागाच्या मदतीने गिधाड संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यांच्या प्रयत्नांना चांगलेच यश आले असून, आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघाने ‘संकटग्रस्त’ म्हणून घोषित केलेल्या इजिप्शियन गिधाडांनी येथील रेस्तरांतील खाद्यावर ताव मारत भूक भागविली.
गिधाडांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. सुदैवाने नाशिक जिल्ह्यात मात्र या पक्ष्याचे स्थान अद्यापही टिकून आहे. हरसूलजवळील खोरीपाडा या आदिवासी वस्तीच्या जवळ डोंगराच्या पायथ्याशी ‘गिधाड रेस्तरां’ प्रकल्प कार्यान्वित आहेत. या भागात पशुधन दगावल्यास आदिवासी लोक वनविभागाला कळवितात. वैद्यकीय तपासणी करून गिधाड रेस्तरांमध्ये मृत्युमुखी पडलेले जनावरे टाकली जातात. या रेस्तरांभोवती ‘चेनलिंक फेन्सिंग’चे कुंपण करण्यात आले आहे. सभोवताली मोह, आंबा, वडाची झाडे आहे. त्यामुळे गिधाडांना झाडांवर आश्रय घेता येतो. खाद्य टाकल्यानंतर तासाभरात शेकडोंच्या संख्येने गिधाडे आकाशातून रेस्तरांमध्ये उतरतात.
पांढऱ्या पाठीचे व लांब चोचीच्या अशा गिधाडांच्या दोन प्रजाती येथे आढळून येतात; मात्र आता इजिप्शियनच्या रूपाने तिसऱ्या प्रजातीची भर पडल्याने हे शुभ वर्तमान मानले जात आहे. चार दिवसांपूर्वी रेस्तरांमध्ये खाद्य टाकण्यात आले तेव्हा चक्क तीन इजिप्शियन गिधाडांनीही भूक भागविल्याचे संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्य शंकर शिंदे म्हणाले. या भागात गिधाडांची संख्या वाढत असून, हे जैवविविधतेच्या दृष्टीने खूप चांगले आहे. रेस्तरांच्या देखभाल दुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे वनक्षेत्रपाल कैलास अहिरे यांनी सांगितले.
तिसरी प्रजाती आल्याने आनंद
खोरीपाड्याचे आदिवासी व वनविभागाचे कर्मचारी गिधाड संवर्धनासाठी मागील सहा वर्षांपासून प्रयत्नशील आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पांढऱ्या पाठीचे आणि लांब चोचीचे मिळून सुमारे अडीचशेपेक्षा अधिक गिधाडांची संख्या या भागात असल्याचे वनअधिकारी सांगतात. काही दिवसांपूर्वीच पहिल्यांदाच गिधाड रेस्तरांवर चक्क तीन इजिप्शियन गिधाडांनी दर्शन दिले.
इजिप्शियन अतिदुर्मीळ
काही वर्षांपूर्वी इजिप्शियन गिधाडे सभोवताली सहज नजरेस पडत होती; मात्र कालांतराने ही अतिदुर्मीळ होत गेली. अधिवास धोक्यात सापडल्याने ही प्रजाती नामशेष झाली की काय? अशी शंकाही घेतली जात होती; मात्र खोरीपाडा रेस्तरांवर तीन गिधाडे नजरेस पडल्याने मोठा दिलासा मिळाल्याचे वन्यजीवप्रेमी सांगतात.