नाशिक : ‘हमारे मुल्क-ए-हिंदोस्ता को तरक्की अता फरमा..., मुल्क हिंदोस्ता में अम्नो-अमान, भाईचारा कायम फरमा..., मुल्क के दुश्मनो के मनसुबे को नेस्तनाबूत फरमा..., अशी प्रार्थना करत शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंतीची मुख्य मिरवणूक (जुलूस) जुन्या नाशकातून रविवारी (दि.१०) काढण्यात आली. पारंपरिक पोशाखात मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.इस्लाम धर्माचे प्रेषित व मानवतेचे पुरस्कर्ते हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती शहर व परिसरासह जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमांनी शांततेत साजरी करण्यात आली. यानिमित्ताने करण्यात आलेल्या आकर्षक सजावटीने मुस्लीमबहुल भागाचे रूपडे पालटले होते. नाशिकरोड, वडाळागावातूूनही सकाळी मिरवणुका काढण्यात आल्या. तसेच शहराची मुख्य मिरवणूक दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास जुन्या नाशकातील चौक मंडई येथून खतीब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. प्रारंभी त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी उपस्थितांनी ‘आमीन’ म्हणत दुजोरा दिला. बडी दर्गाचे विश्वस्त हाजी वसीम पिरजादा, रझा अकादमीचे एजाज रजा मकरानी, शरियत समितीचे सलीम पटेल, बालम पटेल, गुलजार कोकणी आदी उपस्थित होते. सजविलेल्या बग्गीमध्ये अग्रभागी खतीब यांच्यासह शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी होते. बग्गीच्या पाठीमागे जीपमध्ये विवध धर्मगुरूंना स्थान देण्यात आले होते. मिरवणूक मार्गावर दुतर्फा हिरवे, पांढरे ध्वज, स्वागतकमानी, विद्युत माळा लावून सजावट करण्यात आली होती. मिरवणुकीत सहभागी नागरिकांना ठिकठिकाणी विविध परिसरांमध्ये ओली खजूर, बिस्कीट, नानकटाई आदी खाद्यपदार्थांसह पाणीवाटप केले जात होते. दुतर्फा परिसरातील नागरिकांनी मिरवणूक बघण्यासाठी गर्दी केली होती. मिरवणुकीत सुमारे २५पेक्षा अधिक मंडळांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक मंडळाने केवळ साधे साउंड आणि पारंपरिक ध्वनिक्षेपकाच्या वापरावर भर दिल्याचे दिसून आले. सालाबादप्रमाणे यंदाही मिरवणूक डिजेमुक्त राहिली.--इन्फो--बडी दर्ग्यात अन्नदानबागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, आझाद चौक, चव्हाटा, काजीपुरा, मुलतानपुरा, कोकणीपुरा, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौकातून पिंजारघाट रस्त्याने बडी दर्गाच्या प्रारंगणात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोहचली. खतीब यांनी येथे महाप्रसादावर फातिहा पठण केले. त्यानंतर हुसेनी युवक मित्रमंडळाकडून अन्नदान करण्यात आले. अखेरचे मंडळ रात्री ८ वाजेच्या सुमारास बडी दर्ग्यात आले. दुपारी बागवानपुऱ्यात अन्नदानाचा कार्यक्रम झाला.
ईद-ए-मिलाद : ऐ अल्लाह, हमारे मुल्क हिंदोस्ता को तरक्की अता फरमा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 9:47 PM
शहराची मुख्य मिरवणूक दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास जुन्या नाशकातील चौक मंडई येथून खतीब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. प्रारंभी त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
ठळक मुद्दे मिरवणुकीत सुमारे २५पेक्षा अधिक मंडळांनी सहभाग नोंदविला. बडी दर्ग्यात अन्नदानसालाबादप्रमाणे यंदाही मिरवणूक डिजेमुक्त राहिली.