येवला : शहर व परिसरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली.बुधवारी सकाळी लक्कडकोट बंदोबस्तात इदगाह मैदानात, कोर्टासमोरील वली दर्गा मैदानावर शहर - परिसरातील मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाजपठण करून शांतता व सामाजिक सलोखा सौहार्दसाठी प्रार्थना केली.शहरातील समिदया मस्जिद, बाहेरची मस्जिद, चांदफकीर मस्जिद, कच्ची मस्जिद आदी ठिकाणीही ईदनिमित्त सामुदायिक नमजपठण व प्रार्थना करण्यात आली. लक्कडकोट इदगाह मैदानात येवल्याचे आमदार छगन भुजबळ, विधान परिषद सदस्य आमदार नरेंद्र दराडे, बाळासाहेब लोखंडे, राधाकिसन सोनवणे, कुणाल दराडे आदींनी मुस्लीम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, अझहर शाह, आलमगीर शेख, आरिफ निंबूवाले, अन्सार शेख, शकील शेख, मुशरीफ शाह, राजू रंगरेज, महेफुजभाई यांनी सामाजिक सदभाव निरंतर कायम राहो यासाठी नमाजपठण व दुआ मागितल्याचे सांगितले. दरम्यान येवला तालुक्यातील पाटोदा येथेही हा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील इदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांना एकत्रित येऊन नमाजपठण केले. तसेच तालुक्यातील अंदरसूल, नगरसूल, मुखेड, राजापूर, आदी भागात बकरी ईद सण साजरा करण्यात आला. शहर बाजारात फळांचा मोठा व्यापार मुस्लीम बांधव करीत असल्याने त्यांची दुकाने सण असल्याने बंद होती. त्यामुळे फळबाजार शांत होता.श्रद्धेचे प्रतीक म्हणून कुर्बानी देवून बकरी ईद साजरी केली जाते, अशी मान्यता असल्याचे माजी नगराध्यक्ष हुसैन शेख यांनी सांगितले....