आझादनगर : मालेगाव शहरात ईद-ए-मिलादनिमित्त मुस्लीम बांधवांनी अत्यंत उत्साहात मिरवणूक काढली. मिरवणुकीचे नेतृत्व मौलाना सय्यद फारुखमिया चिश्ती यांनी केले. मिरवणुकीचा समारोप अडीच वाजता एटीटी शाळेच्या प्रांगणावर दुवापठणाने झाला. सकाळी आठ वाजता इस्लामपुरा येथील दारालउल्लम हनफिया सुन्निया मदरशापासून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहरातील मुस्लीम बांधव सजविलेल्या वाहनाने व पायी येऊन मिरवणुकीत सहभागी होत होते. थंडी पडल्याने त्याचा परिणाम या मिरवणुकीवर झाला. सकाळपासून आबालवृद्ध मिरवणुकीची वाट बघत होते. मिरवणुकीत मुस्लीम बांधवांकडून नबीच्या स्तुतिजनक घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मिरवणूक बघण्यासाठी ठिकठिकाणी चौकांमध्ये व मोहल्ल्यातील रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती.मिरवणूक इस्लामपुरा, मच्छीबाजार, कुसुंबारोड, हजारखोली, मिर्झा गालीबरोड, नयापुरा, आझादनगर, अमन चौक, चंदनपुरी गेट, किल्ला, गूळबाजार, किदवईरोड व पुन्हा इस्लामपुरा, अन्साररोडमार्गे निघून एटीटी हायस्कूलच्या प्रांगणावर तिचे सभेत रूपांतर झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना अब्दुल नसीम कादरी, हाफिज अरशद रजा मिसबाही यांचे भाषण झाले. मौलाना सय्यद फारुखमिया चिश्ती यांच्या दुवापठणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.यावेळी मुफ्ती वाजीद अली या अलवी, मुफ्ती मुदस्सीर हुसैन अजहरी, मुफ्ती नईम रजा मिसबाही, मुफ्ती इरफान रजा मुफ्ती अहमद रजा अजहरी, मौलाना सय्यद आमिनुल कादरी, हाफिज सय्यद हुसेन यांच्यासह लाखावर मुस्लीम सुन्नी बांधव मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गजानन राजमाने व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अतिरिक्त पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला होता.मालेगावी ईद-ए-मिलादनिमित्त गावातून काढण्यात आलेली मिरवणूक.
ईदनिमित्त मिरवणूक
By admin | Published: December 24, 2015 11:09 PM