नाशिक : रमजान पर्वचा मंगळवारी (दि.४) २९वा उपवास सायंकाळी पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी चंद्रदर्शन घडण्याची दाट शक्यता असून, चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही अधिकृतरीत्या प्राप्त झाल्यास बुधवारी (दि.५) ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्याची घोषणा केली जाईल.रमजान पर्वचे २९ उपवास मंगळवारी पूर्ण होत आहेत. महिनाभरापासून मुस्लीम बांधवांनी पारंपरिक धार्मिक पध्दतीने निर्जळी उपवास करत अल्लाहच्या उपासनेसाठी अधिकाधिक वेळ दिला. गरजू घटकांना धनिक समाजबांधवांकडून ‘जकात’ वाटप केली गेली. पाच वेळेचे नमाज पठणासह ‘तरावीह’च्या खास नमाजचे रात्री उशिरापर्यंत पठण तसेच कुराण पठणावर समाजबांधवांकडून या २९ दिवसांमध्ये भर दिला गेला. यामुळे मशिदींमध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत नागरिकांची रेलचेल पहावयास मिळत आहे.रविवार दुपारपासून सुरू झालेल्याआमावस्येची समाप्ती सोमवारी दुपारी झाली. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी नूतन चंद्रदर्शन उर्दू, मराठी दिनदर्शिकेत दाखविले गेले आहे. विभागीय चांद समितीकडून शुक्रवारच्या नमाजदरम्यान प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून समाजबांधवांना चंद्रदर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रदर्शन घडल्यास त्याची ग्वाही जुने नाशिकमधील शाही मशिदीत होणाऱ्या धर्मगुरूंच्या बैठकीत समक्ष हजर राहून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शहरातील शहाजहांनी ईदगाह मैदान रमजान ईदच्या सामूहिक नमाज पठणाच्या सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. ईदगाहच्या वास्तूवर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. मैदानावरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. चंद्रदर्शन घडल्यास बुधवारी ईदगाह मैदानावर सकाळी दहा वाजता सामूहिकरीत्या ईदचे विशेष नमाजपठण शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली सालाबादप्रमाणे पार पडणार आहे.
चंद्रदर्शन घडल्यास उद्या ईद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 1:44 AM