मालेगाव : मुस्लिम बांधवांची रमजान ईद (दि. १४ ) शुक्रवारी साजरी होत असून, राज्यातील हजारो उर्दू शिक्षक मार्च आणि एप्रिल महिन्याच्या वेतनापासून वंचित असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
शिक्षकांचे वेतन अदा करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वित्त मंत्री अजित पवार आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला अदा करावे, या बाबतीत अनेक शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत. पण, या सर्व शासन निर्णयाची पायमल्ली होताना दिसत आहे. शिक्षकांना थकीत वेतन त्वरित अदा करावे. वेतन देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने केली आहे, असे पत्रकान्वये साजिद निसार अहमद, महेबूब तांबोळी, नाहीद खातून यांनी कळविले आहे.
----------------
आर्थिक नुकसान
अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम शिक्षक बांधवांचे रमजान ईद आणि बकरी ईद दोन मोठे सण आहेत. यात सध्या रमजान महिना संपत आला. ईदही आली. मात्र, राज्यातील दोन - तीन जिल्ह्यांचा अपवाद वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे वेतन अदा झालेले नाही. याच महिन्यात मुस्लिम शिक्षक बांधव प्रामुख्याने नवीन कपडे, इत्यादी वस्तू खरेदी करतात. इस्लाम धर्मात याच महिन्यात वार्षिक उत्पन्नावर जकात काढून गोरगरीब व होतकरू लोकांना वाटली जाते. पगार न झाल्याने मुस्लिम शिक्षक बांधव अडचणीत सापडले आहेत.