नाशिक : त्याग, बलिदानाची शिकवण देणारा सण ईद-उल-अज्हा अर्थात बकरी ईद शहरासह जिल्ह्यात सोमवारी (दि.१२) उत्साहात पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील त्र्यंबकरोडवरील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर शेकडो मुस्लीम बांधवांनी ईदचे सामुहिकरित्या विशेष नमाजपठण केले. यावेळी कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांकरिता शहंशाहे नाशिक रिलिफ फंड समितीच्या माध्यमातून आर्थिक मदतनिधीच्या उभारणीला ईदगाहवरून प्रारंभ करण्यात आला.सालाबादप्रमाणे यावर्षीही जिलहिज्जा या उर्दू महिन्याच्या १० तारखेला उत्साहात बकरी ईद शहरात साजरी करण्यात आली. पावसाने विश्रांती घेतलयामुळे खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ईदगाह मैदानावर सामुहिकरित्या नमाजपठणाचा सोहळा विनाव्यत्यय शांततेत पार झाला. यावेळी शेकडो नाशिककर समाज बांधवांनी ईदचे नमाजपठण केले. तत्पूर्वी मौलाना मुफ्ती महेबुब आलम यांनी प्रवचनातून उपस्थितांना बकरी ईदमागील धार्मिक संकल्पना विशद करून सांगितली. त्यानंतर सव्वा दहा वाजता खतीब यांनी उपस्थितांना ईदच्या नमाजची पद्धत समजावून देत नमाजपठणासाठी सज्ज केले. नमाजपठण संपन्न झाल्यानंतर विशेष ‘खुतबा’ अरबी भाषेतून पठण करण्यात आला. यावेळी देशाच्या एकात्मतेसाठी आणि राज्याच्या पश्चिम भागासह देशात विविध भागांमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीच्या निवारणासाठी विशेष दुवा मागितली गेली. यावेळी उपस्थित मुस्लीम बांधवांनी खतीब यांना ‘आमीन’ म्हणत प्रतिसाद दिला. दुवानंतर इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर अधारित दरूदोसलामचे उपस्थितांकडून एकसुरात पठण करण्यात आले. यावेळी मैदानाभोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील अनेक वर्षांपासून ईदच्या खास सोहळ्याचे सुत्रसंचालनाची भूमिक बजावणारे धार्मिक नेते हाजी सय्यद मीर मुख्तार यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते यंदा उपस्थित राहू शकले नाही. सुत्रसंचालन नुरमंहमद यांनी केले. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, दशरथ पाटील, शरद आहेर आदि उपस्थित होते.
ईदचे नमाजपठण उत्साहात : ईदगाहवरून पूरग्रस्तांसाठी मदतनिधीची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 2:09 PM
दुवानंतर इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर अधारित दरूदोसलामचे उपस्थितांकडून एकसुरात पठण करण्यात आले. यावेळी मैदानाभोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ठळक मुद्देईदचे सामुहिकरित्या विशेष नमाजपठण मदतनिधीच्या उभारणीला ईदगाहवरून प्रारंभ पूरपरिस्थिती निवारणासाठी विशेष दुवा