सिन्नर : सिन्नर-नाशिक महामार्गावरील जिंदाल फाट्यावरील साई प्रसाद टायर्स या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोख 1 लाख रुपयांसह 8 लाख 22 हजारांचे 209 टायर्स चोरुन नेल्याची घटना घडली.माळेगाव येथील संदीप सांगळे यांचे जिंदाल फाट्यावर टायरचे दुकान असून बुधवारी कामानिमित्त ते बाहेरगावी गेले होते. रात्री उशिरा आल्याने दिवसभरात जमा झालेले लाखभर रुपये माणसाने गल्ल्यातच ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी शटरचे पाच कुलूप तोडून शटर उचकवत दुकानात प्रवेश केला. कार व मोटारसायकलचे मिळून विविध कंपन्यांचे 209 टायर्स अंदाजे किमत 7 लाख 22 हजार व गल्ल्यातील 1 लाख रोख असा 8 लाख 22 हजारांचा ऐवज घेऊन चोरटे फरार झाले. सकाळी दुकान उघडण्यासाठी सांगळे आले असता चोरीचा हा प्रकार लक्षात आला. दुकानाबाहेर दहा टायर वाहन येऊन गेल्याच्या खूणा जमिनीवर दिसल्याने आयशर अथवा अन्य वाहनात टायर भरुन चोरटे फरार झाल्याचे समोर आले आहे. दुकानात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्यात आले असून चोरट्यांनी कॅमेरे तसेच ठेवून कॅमेर्याचे फुटेज जमा होते ते डी.व्ही.आर. ही पळवून नेले. दुकानातील सर्वच टायर्स चोरी गेल्याने सांगळे यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. विशेष म्हणजे शटरला सेंटर लॉक असून दोन्ही बाजूला दोन-दोन कुलूपे असताना ते सर्वच तोडल्याने दुकानांच्या सुरक्षेसाठी अजून कुठल्या उपाययोजना करायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक शमिष्ठा घारगे- वालावलकर, उपअधिक्षक माधव रेड्डी, पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली व तपासी अधिकार्यांना मार्गदर्शन केले.
माळेगाव फाट्याजवळील टायर दुकानातून साडेआठ लाखाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 4:37 PM
सिन्नर : सिन्नर-नाशिक महामार्गावरील जिंदाल फाट्यावरील साई प्रसाद टायर्स या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोख 1 लाख रुपयांसह 8 लाख 22 हजारांचे 209 टायर्स चोरुन नेल्याची घटना घडली.
ठळक मुद्देअंदाजे किमत 7 लाख 22 हजार व गल्ल्यातील 1 लाख रोख असा 8 लाख 22 हजारांचा ऐवज घेऊन चोरटे फरार