नाशिक : घरफोडी आणि दुचाकी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून आठ दुचाकींसह घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरोधात अंबड पोलीस ठाण्यात १० जूनला दाखल गुन्ह्याची चौकशी करताना अंबड पोलिसांना सुमारे १८ दुचाकी चोरींच्या प्रकरणांसह अंबड परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचीही उकल करण्यात यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी शनिवारी (दि.१६) पोलीस आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली.नाशिकच्या अंबड एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत घरफोडी झाल्याबाबात अंबड पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या सूचनांवरून गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरचे चुंचाळे येथील रहिवासी विजय केशव गुप्ता (२१), प्रशिक ऊर्फ भुऱ्या बाळू भरीत (१९) व वरचे चुंचाळेच्याच आंबेडकरनगर येथील नवनाथ ऊर्फ डॉलर रामदास साळवे (१९) या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अबंड एमआयडीसीमध्ये कंपनीमध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याने तिघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.आरोपीने दिलेल्या जबाबावरून त्यांनी चार दुचाकी चुंचाळे शिवारातील एका विहिरीत फेकल्या असून, अन्य सहा दुचाकींविषयी आरोपींकडून माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण करीत असून, अटक केलेल्या आरोपींकडून अशाप्रकारचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मण पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून कंपनीतून चोरी केलेले एक लाख २५ हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या वस्तू जप्त करण्यात आले आहे, तसेच नवनाथ ऊर्फ डॉलर साळवेकडून चोरीची दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईतून अंबड, इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी झालेल्या दोन लाख ४० हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी चोरीचे गुन्हे उगडकीस आले आहेत.
मुद्देमालासह आठ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:05 AM