देवळा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रविवारपर्यंत आठ उमेदवारांनी १३ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून यापैकी गटासाठी चार, तर गणासाठी नऊ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती सहायक निवडणूकनिर्णय अधिकारी कैलास पवार यांनी दिली. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या लोहोणेर व वाखारी गटात अद्यापपर्यंत एकही नामांकनपत्र दाखल झालेले नाही. आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांची चांगलीच कसोटी लागत असून कागदपत्रांची जमवाजमव करताना धावपळ करावी लागत आहे. नवीन प्रशासकीय कार्यालयात तहसीलदार पवार यांनी नोटरी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उमेदवारांना थोडाफार दिलासा मिळाला. इच्छुक उमेदवार आज नामांकनपत्र दाखल करण्यापूर्वी पक्षाच्या एबी फॉर्मची प्रतीक्षा करताना दिसत होते. परंतु राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले नाहीत. सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करताना कमालीची गोपनीयता पाळताना दिसत आहेत. उमेदवारांची नावे लवकर जाहीर केल्यास विरोधी पक्षाला व्युहरचना बदलण्यास वाव मिळू नये, असा उद्देश त्यामागे दिसत आहे. यामुळे इच्छुक उमेदवार तिकीट आपल्यालाच मिळणार असा ठामपणे दावा करताना दिसत असले तरी तिकीटाची शाश्वती वाटत नसल्यामुळे एका जागेसाठी दोन ते तीन नामांकनपत्र दाखल करतांना दिसत आहेत. आहेत. उमराणे गटात तीन उमेदवारांनी चार नामांकनपत्र दाखल केले आहेत. श्रावण थोरात, सोमनाथ पवार यांच्या अर्जासह भाऊराव अहिरे यांनी दोन नामांकनपत्र दाखल केली आहेत. दहीवड गणात ललिता केदा शिरसाठ यांचा एक अर्ज असून, सविता देवरे यांनी तीन नामांकनपत्र दाखल केले आहेत. महालपाटणे गणात अरु ण अहिरे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले असून, शिवाजी अहिरे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. लोहोणेर गणात विमलबाई शेवाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आतापर्यंत आलेला आहे. (वार्ताहर)
देवळ्यात आठ उमेदवारांचे अर्ज
By admin | Published: February 06, 2017 12:03 AM