नाशिक : मातृत्व अन् पितृत्व मिळविण्यासाठी वंध्यत्वाशी लढा देणारी अनेक जोडपे समाजात वावरत आहेत. दुसरीकडे एका जोडप्याने त्यांचे जन्मलेले अवघ्या आठ दिवसांचे पुरुष जातीचे बाळ एका सार्वजनिक शौचालयाच्या भांड्यात टाकून पळ काढला. माणुसकीला कलंक लावणारे हे कृत्य करताना मात्र ‘त्या’ अज्ञात स्त्री किंवा पुरुषाचे काळीज थरथरलं नसेल का..? असा प्रश्नही जनमाणसांतून उपस्थित होत आहे.
नाशिकच्या पाथर्डी गावातील एका सार्वजनिक शौचालयामध्ये सोमवारी (दि.४) सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. नेहमीप्रमाणे महापालिकेचे सफाई कर्मचारी शौचालयाची स्वच्छता करण्यासाठी आले असता, तेथील एका भांड्यात त्यांना मृतावस्थेत नवजात शिशू आढळून आले. त्यांनी तत्काळ त्यांच्या सुपरवायझरला घटनेची माहिती कळविली. त्यानंतर इंदिरानगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला बघितले असता बाळ मृत्युमुखी पडलेले होते. तातडीने बाळाचा मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक नोंद करून हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.
...आता गर्भपाताचा अधिकार प्रत्येकीलाच!
विवाहित असो किंवा अविवाहित असो, त्या प्रत्येक महिलेला सुरक्षित अन् कायदेशीर गर्भपाताचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. २४ आठवड्यांपर्यंत महिला गर्भपात करू शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. अविवाहित महिलांच्या गर्भपाताशी संबंधित एका प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ‘जसा समाज बदलतो तसे नियम बदलतात. त्यामुळे कायदासुद्धा लवचिक असायला हवा’ असे मत नोंदविले होते. नव्या कायद्यानुसार गर्भपाताचा कालावधी वाढवून आता २० आणि २४ आठवडे असा करण्यात आला आहे.