नाशिक : नवीन पिकाची सुरू झालेली आवक आणि नाफेडकडे असलेला कांदा बाजारात येऊ लागताच खुल्या बाजारात उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून मागील आठ दिवसांत क्विंटलमागे सुमारे १००० ते १५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मंगळवारी लासलगाव बाजारात सकाळच्या सत्रात उन्हाळ कांदा सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकला गेला तर लालकांद्याला सरासरी २२०१ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. नांदगाव बाजार समितीत तर उन्हाळचा दर सरासरी १७०१ रुपयांपर्यंतच राहिले. दिवाळीनंतर उन्हाळ कांदा दरात सातत्याने घसरण सुरू झाली आहे. दरवर्षी साधारणत: नोव्हेंबर महिन्यात उन्हाळ कांदा संपुष्टात येत असतो त्यानंतर लाल कांद्याची आवक सुरू होते. मात्र, यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे लाल कांदा बाजारात येण्यास उशीर होईल आणि उन्हाळ कांद्याला चांगला दर मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची साठवणूक केली होती. त्यामुळे अजूनही बाजारात उन्हाळ कांद्याची आवक सुरू आहे. दिवाळीनंतर भाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच नाफेडकडील साठा केलेला कांदा बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली आहे. शेतकऱ्यांकडे अद्यापही ३० ते ४० टक्के साठा शिल्लक असला तरी त्याला दर मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही.
चौकट-
व्यापारीही अडचणीत
कांदादराबाबत यावर्षी काही व्यापाऱ्यांचेही गणित चुकले असल्याची चर्चा होत आहे. ज्या व्यापाऱ्यांनी तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटलने कांदा खरेदी केला आहे तो विकणे आता मुश्कील झाले आहे. यामुळे अनेक व्यापाऱ्यांचा माल ट्रकमध्येच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे.
चौकट-
बियाण्याच्या कांद्याला मिळतोय दर
या काळात बियाणे उत्पादक कंपन्या बियाण्यासाठी कांद्याची खरेदी करत असतात यात केलेली गुंतवणूक पुढे बियाण्याच्या रूपाने वसूल होत असल्याने अनेक बियाणे कंपन्या उत्कृष्ट प्रतीच्या कांद्याला चांगला दर देऊन माल खरेदी करत आहेत. त्यामुळे काही बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याचे दर अधिक असल्याचे दिसून येते.
कोट-
कांद्याची झालेली आयात, नवीन पिकाची सुरुवात आणि नाफेडकडे असलेला साठा यांचा एकत्रित परिणाम उन्हाळ कांदा दरावर झाला आहे. अनेक व्यापाऱ्यांना आता कांदा विकायचा कसा आणि अडकलेले भांडवल काढायचे कसे असा प्रश्न पडला आहे.
- सितश जैन, कांदा व्यापारी