नाशिक : बागलाण तालुक्यातील किकवारी येथून नाशिक येथे लग्नसमारंभासाठी निघालेल्या क्रूझरचे टायर फुटून गाडी दुभाजक ओलांडून पलीकडून जात असलेल्या बसवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये आठजण ठार, तर सहा गंभीर जखमी झाले. शनिवारी (दि. २३) सकाळी शिरवाडे वणीजवळील खडकजांब शिवारात झालेल्या या अपघातात सहा महिलांचा जागीच, तर दोघांचा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये सात महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. बागलाण तालुक्यातील किकवारी येथील एकाचे नाशिक येथे लग्न होते. त्यासाठी गावातील नागरिक क्रूझर गाडीतून (क्र. एमएच १५ ईबी ३६१९) निघाले होते. मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्यानजीक सकाळी ११.१५च्या सुमारास क्रूझरचे पुढील टायर फुटले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि क्रूझर थेट दुभाजकावरून शेजारच्या रस्त्यावर गेली. याच वेळी नाशिक - सटाणा बस या रस्त्यावरून जात होती. या धावत्या बसवर कू्रझर आदळली आणि भीषण अपघात झाला. त्यातच मागून येणारी इनोव्हा कारही या अपघातग्रस्त वाहनांवर येऊन आदळली. या अपघातामध्ये धनुबाई केदा काकुळते (६५) , तेजश्री साहेबराव शिंदे , करूणाबाई बापू शिंदे, सरस्वतीबाई नथू जगताप (सर्व रा. किकवारी), रत्ना राजेंद्र गांगुर्डे (४५) रा. डांगसांैदाणे, क्रुझर चालक अशोक पोपट गांगुर्डे (रा.कळवण) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील जखमी शोभा संतोष पगार (४०), सिद्धी विनायक मोरे (१४) दोघी रा. किकवारी यांचे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पिंपळगाव बसवंत खाजगी रूग्गालयात यश प्रकाश पगारे (८), सरला प्रकाश पगारे (३६) दोघे रा.मुंजवाड.ता.बागलाण, शंकर चिंधू काकुळते (५०), रिना शशिकांत जगताप (३२) दोघे रा.किकवारी कल्याणी कृष्णा शिंदे (४०) रा. कडाणे, ता.बागलाण, मयूर ज्ञानेश्वर नवले यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले . सायंकाळी उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातामुळे चारही गावांवर शोककळा पसरली आहे.या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अशी, अपघातग्रस्त क्रुझरमध्ये सुमारे सतरा प्रवासी होते. या गाडीचे टायर कच्चे होते. पुढील टायर फुटल्याने दुभाजक ओलांडून गाडी बाजुच्या रत्यावर गेली. याचवेळी समोरून बस आल्याने मोठा अपघात झाला.
क्रूझरचे टायर फुटून अपघातात आठ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 1:04 AM