नाशिक : शहरातून तब्बल पाच बुलेट आणि तीन दुचाकी चोरून जळगावला फरार झालेल्या पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़ हेमंत राजेंद्र भदाणे (२३ रा.धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़ दरम्यान, भदाणेकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़ वाहनचोरीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ़रवींद्र सिंगल यांनी दिले होते़ त्यानुसार सराईत गुन्हेगार हेमंत भदाणे हा अनेक महिन्यांपासून जळगावमध्ये राहत असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती़ पोलिसांच्या पथकाने जळगावला जाऊन खात्री केली असता शहरातून महागड्या दुचाकी चोरून त्या कमी किमतीत विक्री करीत असल्याचे समोर आले़ भदाणे यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने वाहनचोरीची कबुली दिली़ नाशिक शहर तसेच ग्रामीणमधून चोरलेली एमएच ४१ एजे ०८७१, एमएच १४ एफव्ही ५७५९, एमएच १५ एफडी ४००५, एमएच १५ एफ आर ३१३३, एमएच १५ एफएक्स ९३२१ या बुलेटसह एमएच १५ एफ झेड ५५८०, एमएच १५ एफएल ८२६१ व अन्य एक स्प्लेंडर दुचाकी असा सुमारे ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. पाटील, उपनिरीक्षक एस. एस. वाघ, यांच्या पथकाने ही कारवाई केली़
आठ लाखांच्या चोरीच्या दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 1:01 AM