नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार चिठ्ठी पद्धतीने फेब्रुवारीअखेर निवृत्त होणार असून, उर्वरित शिल्लक आठ सदस्यांनाही त्यांच्या पक्षामार्फत राजीनामे घेऊन सक्तीने निवृत्त केले जाणार आहेत. चालू पंचवार्षिक काळात दुस-या वर्षी स्थायी समितीवर जाण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. अधिकाधिक सदस्यांना स्थायीवर जाण्याची संधी मिळावी, यासाठी सर्वच पक्षांमार्फत सदस्यांचा कालावधी एक वर्षाचाच करण्यात येणार आहे.फेबु्वारी २०१७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन सर्वाधिक ६६ जागा जिंकत भाजपाने सत्ता संपादित केली. त्यानंतर १५ मार्चला महापौर-उपमहापौरपदाची तर ३० मार्चला स्थायी समितीवर तौलनिक संख्याबळानुसार १६ सदस्यांची निवड करण्यात आली होती. त्यात भाजपाकडून जगदीश पाटील, सुनीता पिंगळे, शशिकांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, विशाल संगमनेरे, डॉ. सीमा ताजणे, अलका अहिरे, मुकेश शहाणे व श्याम बडोदे, शिवसेनेकडून सूर्यकांत लवटे, दत्तात्रेय सूर्यवंशी, प्रवीण तिदमे व भागवत आरोटे, कॉँग्रेसकडून वत्सला खैरे, राष्टवादीकडून राजेंद्र महाले तर मनसेच्या कोट्यातून अपक्ष मुशीर सय्यद यांची वर्णी लागली होती. दरम्यान, ७ एप्रिल रोजी स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवड होऊन प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभ झाला होता. त्यामुळे विद्यमान कार्यकारिणीला १० महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. नियमानुसार, २८ फेबु्रवारीपर्यंत विद्यमान स्थायी समितीची मुदत आहे. त्यापूर्वी, स्थायी समितीवरील ८ सदस्य चिठ्ठी पद्धतीने निवृत्त केले जाणार आहेत. तर नियमानुसार उर्वरित आठ सदस्यांना एक वर्षाचा कालावधी आणखी मिळू शकतो. परंतु, अधिकाधिक नगरसेवकांना स्थायी समितीवर जाण्याची संधी मिळावी यासाठी समितीवरील सदस्यांचा कालावधी एक वर्षाचाच ठेवण्याचा विचार सर्वच पक्षांमध्ये सुरू आहे. सत्ताधारी भाजपाने तर यापूर्वीच एक वर्षापुरताच कालावधी निश्चित केलेला आहे तर मागील पंचवार्षिक काळानुसार शिवसेना, राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि मनसे या पक्षांकडूनही एक वर्षापुरतीच सदस्यांना संधी दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत. स्थायीवर जाण्यासाठी शिवसेनेत सर्वाधिक चुरस दिसून येणार आहे. नियमानुसार, आठ सदस्य निवृत्त होतील तर उर्वरित आठ सदस्यांकडून राजीनामे स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे स्थायी समितीवर सर्वच्या सर्व १६ सदस्य नवीन चेहरे असणार आहेत. स्थायीवर जाण्यासाठी महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिलेला असल्याने आतापासूनच इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.मनसे, रा.कॉँ; कॉँग्रेसला पूर्ण संधीसार्वत्रिक निवडणुकीत राष्टवादी आणि कॉँग्रेसचे प्रत्येकी ६ तर मनसेचे पाच सदस्य निवडून आले आहेत. तीनही पक्षांचे गटनेते वगळले तर उर्वरित सदस्यांना स्थायीवर जाण्याची संधी मिळणार आहे. राष्टवादी आणि कॉँग्रेससोबत प्रत्येकी एक अपक्ष सहयोगी झाल्याने त्यांनाही संधी द्यावी लागणार आहे. मनसेने आपल्या कोट्यातून अपक्ष सय्यद मुशीर यांना संधी दिलेली आहे. त्यामुळे मनसेच्या अन्य सदस्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे. राष्टवादी आणि कॉँग्रेसमध्ये मात्र, अपक्षांना संधी देण्यावरून तंटा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाशिक महापालिकेतील स्थायी समितीत आठ सदस्यांना घ्यावी लागणार सक्तीची निवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 8:26 PM
राजीनामे घेण्याची तयारी : सर्वपक्षीय वापरणार एक वर्षाचा फार्म्युला
ठळक मुद्देस्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार चिठ्ठी पद्धतीने फेब्रुवारीअखेर निवृत्त होणारअधिकाधिक सदस्यांना स्थायीवर जाण्याची संधी मिळावी, यासाठी सर्वच पक्षांमार्फत सदस्यांचा कालावधी एक वर्षाचाच करण्यात येणार आहे