नाशिक : साप पकडण्यात माहीर तसेच सोशल मीडियावरील यू-ट्यूब, फेसबुक यावर प्रसिद्ध असलेला पंजाब राज्यातील सर्पमित्र विक्रमसिंग मलोत याचा पिंपळगाव खांब येथील बंगल्यात विषारी कोब्रा साप हाताळत असताना सर्पदंश झाल्याने ३ आॅक्टोबरला मृत्यू झाला़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी मयत विक्रमसिंगसह आठ संशयित सर्पमित्रांवर सदोष मनुष्यवध तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़
पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांमध्ये जसविंदरसिंग सेवासिंग (रा. श्री अनंतपूर साहिब, जि. रूपनगर, पंजाब), साहिल नरेश माथूर (रा. पंजाब), ज्ञानेश्वर सोनार (रा. त्र्यंबकेश्वर), मयुरी वानखेडे (रा. पाथर्डी, नाशिक), शरद सायखेडकर (रा. त्र्यंबकेश्वर), गणेश गाडेकर (रा. सामनगाव, नाशिकरोड), बाळू बोराडे (पिंपळगाव खांब) व योगेश पवार (रा. नाशिक) यांचा समावेश आहे़ पोलीस उपनिरीक्षक बाकले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि़३) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पिंपळगाव खांब येथील रहिवासी तथा सर्पमित्र बाळू बोराडे याच्या बंगल्यावर सर्व तथाकथित संशयित सर्पमित्र जमले होते़
घरात वन्यप्राणी साप बाळगणे हा गुन्हा असल्याचे माहिती असतानाही संशयित बोराडे यांच्या बंगल्यात तीन कोब्रा जातीचे विषारी नाग होते़ या सापांबरोबरील स्टंटबाजी ही जिवावर बेतणारी असल्याचे माहिती असूनही विक्रमसिंग मलोत हा स्टंटबाजी करीत होता़ या विषारी सापांना निष्काळजीपणे हाताळल्याने पंजाब येथील स्नेक हॅण्डलर विक्रमसिंग मलौत (रा. अनंतपूर साहिब, जि. रूपनगर, पंजाब) याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यास विषारी सापाने दंश केला व मलोत याचा काही वेळातच मृत्यू झाला.
बोराडे याच्या बंगल्यात जमलेल्या सर्पमित्रांनी विक्रमसिंग यास साप हाताळण्यास उत्तेजन दिल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून समोर आले आहे़ पोलिसांनी या सर्पमित्रांना अटक केली असून, संशयितांमध्ये मयत मलौत याच्या भावाचाही समावेश आहे़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवध (३०४ - अ), वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्पमित्रांकडून सर्प तस्करी?शहरात सर्पमित्रांचा सुळसुळाट झाला असून, कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण वा सापांबद्दल माहिती वा अभ्यास नसतानाही साप पकडले जातात़ एक-दोनदा साप पकडल्यानंतर सर्पमित्र अशी समाजात व सर्पमित्रांसमवेत ओळत होते़ या ओळखीतूनच सापांची तस्करी केली असल्याची चर्चा असून, बहुतांशी सर्पमित्रांची संपत्ती पाहता या चर्चेला पुष्टी मिळत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़