देवळाली कॅम्प : छावणी परिषद निवडणुकीतील पराभवास ज्येष्ठ नेत्यास जबाबदार धरून एका माजी नगरसेवकाने समर्थकांसह वॉर्डातील या ज्येष्ठ नेत्याच्या घरावर दगडफेक करून मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री देवळाली कॅम्पमधील हाडोळा परिसरात घडली़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात माजी नगरसेवकासह आठ समर्थकांवर मारहाण, दगडफेक व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे़देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार छावणी परिषद निवडणुकीत विलास पवार यांची पत्नी वॉर्ड एकमधून, तर ते स्वत: वॉर्ड क्रमांक पाचमधून पराभूत झाले़ या पराभवास वॉर्डातील ज्येष्ठ नेते विश्वनाथ काळे हेच जबाबदार असल्याची पवार व त्यांच्या समर्थकांची समजूत होती़ त्यातूनच शनिवारी रात्री संशयित विलास सीताराम पवार, मुनावर लियाकत सय्यद, मारुफ अजगर अली सय्यद, राजेंद्र जगन्नाथ सोनवणे, विकास सुनील जाधव, संजय मारुती साळवे, प्रशांत रवींद्र पगारे, मुर्तुजा युसूफ शेख, विक्रम सुरेश पवार हे आपल्या सुमारे सव्वाशे समर्थकांसह रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ काळे यांच्या घरावर चाल करून गेले़या संशयितांना काळे यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात घुसून महिला व पुरुष सदस्यांना बेदम मारहाण केली़ घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकींचे तोडफोड करून घरातील महिलांचा विनयभंग केल्याचेही फिर्यादित म्हटले आहे़ यानंतर या जमावाने काळे यांच्या घरावर दगडफेक केल्याने पंकज गांगुर्डे हा युवक जखमी झाला़ याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी माजी नगरसेवक विलास पवार यांच्यासह नऊ संशयितांना अटक केली असून, रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली़ (वार्ताहर)
माजी नगरसेवकासह आठ समर्थकांवर मारहाण, दगडफेक व विनयभंगाचा गुन्हा
By admin | Published: February 02, 2015 12:53 AM