गौरी मयूर भावसार हिचा तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. पंचवटीतील रामवाडी हे गौरीचे माहेर असून जुने नाशिकमधील खैरे गल्लीतील दीक्षित चाळ हे तिचे सासर होते. गौरीने शनिवारी रात्री सासरी राहत्या घरी लाकडी आढ्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार सासरच्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून गौरीला मृत घोषित केले.
दरम्यान, रविवारी सकाळी तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी गौरीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातून ताब्यात घेत घरी नेला. तेथून अंत्ययात्रा पंचवटी अमरधाममध्ये आणण्यात आली. या ठिकाणी मृतदेह सरणावर ठेवण्यापूर्वी प्रवेशद्वारावरच ठेवून कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत सासरच्या लोकांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत गौरीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा आक्रमक पवित्रा कुटुंबीयांनी घेतला. यावेळी संतप्त शोकाकुल कुटुंबीयांची पाेलिसांनी समजूत घातली. गौरीच्या सासरच्या काही लोकांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेत वाहनातून भद्रकाली पोलीस ठाण्यात नेले. यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह अमरधाममध्ये नेला व अंत्यसंस्कार केले.
पोलिसांनी गाठले पंचवटी अमरधाम
रविवारी दुपारच्या सुमारास गौरीच्या आईसह अन्य नातेवाईक महिलांनी अमरधामच्या प्रवेशद्वारावर जोरजोराने हंबरडा फोडला. सासरच्या लोकांकडून केल्या जाणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली, तिच्या मृत्यूला सासरचे लोक कारणीभूत असल्याचा आरोपही यावेळी माहेरच्या कुटुंबीयांनी केला. याप्रसंगी अमरधामजवळ मोठी गर्दी जमल्याने तणाव निर्माण होऊ नये, यासाठी भद्रकाली पोलिसांनी अमरधामच्या दिशेने धाव घेतली.
भद्रकाली पोलीस ठाण्यात नातेवाइकांची धाव
गौरीच्या आत्महत्येप्रकरणी सासरचे लोक जबाबदार असल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तिचे नातेवाईक भद्रकाली पोलीस ठाण्यात जमलेले होते. रात्री दहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत रात्री साडेआठ वाजता वरिष्ठ पाेलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गौरीने तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. तिच्या माहेरच्या कुटुंबातील सदस्यांनी भद्रकाली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला जात आहे.