तालुक्यात तीन वर्षांपूर्वी १२३ पैकी ९१ गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबविला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोरोना संसर्गाने ही संख्या यंदादेखील घटली असून या वर्षी ५८ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविला गेला आहे.
गावाचे सामाजिक ऐक्य अबाधित राहावे, शांतता टिकून राहावी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेच्या पुढाकाराने ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना पुढे आली. गेल्या काही वर्षांत या संकल्पनेला गावोगाव प्रतिसादही मिळू लागला आहे.
तालुक्यात २०१८ मध्ये ७२ गावांनी या संकल्पनेला प्रतिसाद दिला होता तर शहर हद्दीतील १९ असे एकूण ९१ गावे या उपक्रमात सहभागी झाली होती. विशेष म्हणजे या गावांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने दारूबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, महिला सक्षमीकरण, आरोग्य अशा विविध विषयांवर जनजागृती उपक्रम राबविले गेले. बालभोजन, कीर्तन, प्रवचन, विविध स्पर्धांचे आयोजन करण्याची प्रथाच सुरू झाली होती. लक्षवेधी गणेश मंडळांचा गौरवही पोलीस यंत्रणेकडून केला जाऊ लागला होता. मात्र, कोरोना संसर्गाने गणेशोत्सवालाही बाधा झाली. अनेक मंडळांनी स्वतःहून थांबून घेतले तर काहींनी प्रथा म्हणून श्रीगणेशाची स्थापना सुरू ठेवली अन् उपक्रम व कार्यक्रम मात्र थांबले.
-----------------------------
यंदा शहर पोलीस ठाणे हद्दीतील १९ तर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील ३९ अशा एकूण ५८ गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबविला गेला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांचा विचार करता शहरात २० लहान गणेश मंडळांनी तर १८ मोठ्या गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली. तालुका पोलीस स्टेशन हद्दीत लहान ६ तर मोठ्या ५ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली असून ३९ गावांत एक गाव एक गणपती उपक्रम राबविला गेला असल्याचे तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी सांगितले.