नाशिक- भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच भुजबळ यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
भाजपत ओबीसी नेते नाराज असल्याच्या चर्चांना त्यांनी दुजोरा दिला. भाजपचे नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले त्यांच्या आरोपात तथ्य असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी खडसे कोणाला भेटले म्हणजे त्या पक्षात त्यांनी प्रवेश केला असे होत नाही. खडसे हे अनुभवी नेते असून ते योग्य निर्णय घेतील असे सांगतानाच भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची नाराजी हा भाजपाच अंतर्गत प्रश्न असल्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर खाते वाटप हा पूर्णत: मुख्यमंत्र्यांचा अधिकार असून येत्या दोन दिवसात यासंदर्भातील प्रश्न मिटतील अशी माहिती राष्टÑवादीचे नेते आणि विद्यमान मंत्री छगन भुुजबळ यांनी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांना देण्यास आपला विरोध नाही. मात्र उपमुख्यमंत्रीपदी कोणाला संधी द्यावी हा सर्वस्वी राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांचा अधिकार असल्याचे भुजबळ म्हणाले. नव्या सरकारवर होऊ लागलेल्या टीकेसंदर्भात बोलताना भुजबळ यांनी या सरकारमध्ये सर्व पक्षातील अनुभवी नेते आहेत. त्यामुळे सरकारला थोडा वेळ द्या आणि मगच टिका करा असेही ते म्हणाले.