नाशिक-
राज्यात नवं सरकार आल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचे माजी पालकमंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का दिला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या नाशिक जिल्हा नियोजन कार्यसमितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या ५६८ कोटींच्या निधी वाटपाला स्थगिती दिली आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी यासंदर्भातील तक्रार केली होती. या तक्रारीची तातडीनं दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन निधी वाटपाला ब्रेक लावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली, बंगल्याच्या चारही बाजूला पोलीस तैनात
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी सुरू असताना तुम्ही अशी बैठक घेतलीच कशी? असा सवाल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी डी. गंगाधरन यांना विचारला. तसंच त्यांच्याशी चर्चा करुन सर्व निधी वाटपाची कामं तूर्तास थांबविण्याचे आदेश दिले आहेत. डी. गंगाधरन यांनी जिल्हा नियोजन शासनाकडून ६०० कोटींचा निधी नियतव्यय मंजूर केला आहे. पण कोणत्याही विभागास निधीचं वाटप झालेलं नाही. केवळ कोणत्या विभागाला किती निधी द्यायचा याचा आढावा घेण्यात आला, असं स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डी. गंगाधरन यांनी दिलं आहे.
शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला, भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी?
राज्यात नुकतंच नवं सरकार स्थापन झालं आहे. यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता ४ किंवा ५ जुलै रोजी नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ निश्चित होण्याआधीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बैठकांचा सपाटा लावत कामाला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन राज्यातील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला आणि पूर्वतयारीच्या सूचना दिल्या. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातील मुद्द्यावरुन अधिकाऱ्यांची बैठक घेत कोर्टात आपली बाजू कशी भक्कमपणे मांडता येईल याबाबत कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.