मालेगाव : मालेगाव तालुक्यात माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेशी बंड पुकारून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना विधानसभेवर पाठविण्यासाठी आपला मतदारसंघ देण्याची तयारी दर्शविणारे दादा भुसे यांनी अचानक ठाकरेंना पाठ दाखविली आणि बंडाचे निशाण फडकाविले. भुसे यांच्या बंडानंतर तालुक्यातील बव्हंशी शिवसैनिक भुसे यांच्या पाठीशी असले तरी जुने निष्ठावंतांनी मोट बांधत उद्धव ठाकरे यांचीच पाठराखण केली आहे. त्यामुळे आगामी काळात भुसे समर्थक विरुद्ध निष्ठावंत शिवसैनिक असा सामना पाहायला मिळू शकतो.
तालुक्यातील सुमारे ५०० शिवसेनेच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर हजेरी लावून प्रतिज्ञा पत्रे भरून दिली आहेत. ठाकरे समर्थकांच्या बैठकादेखील होत आहेत. मात्र शिंदे गटाच्या विद्यमान आमदार आणि माजीमंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांची संख्या मोठी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या विभागीय आढावा बैठकीत दिसून आले. त्यामुळे ही बैठक होती की शक्तिप्रदर्शन अशी चर्चा होत आहे. मदार भुसे यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपली निष्ठा मातोश्री चरणी अर्पण केली असली तरी यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणापासून दूर गेलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांची संख्या जास्त होती. येत्या मंगळवारी युवासेनेचे आदित्य ठाकरे मालेगावात येत असून, त्यांच्या सभेत होणाऱ्या गर्दीवरून निष्ठावंतांची ताकद लक्षात येईल. वास्तविक शिंदे गटात असलेल्या माजीमंत्री आमदार दादा भुसे यांच्या गटाकडे समर्थकांची संख्या मोठी आहे हे नाकारता येणार नाही कारण आज त्यांच्या ताब्यात ७० टक्के म्हणजे ५३ ग्रामपंचायती असल्याचा दावा करण्यात येत आहे.
शिवसेनेची लागणार कसोटी
सध्या महापालिकेत शिवसेनेचे १३ नगरसेवक असून, १ स्वीकृत नगरसेवक आहे. जिल्हा परिषदेत दोन सदस्य आणि पंचायत समितीत सहा सदस्य सेनेचे आहेत. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीदेखील शिवसेनेच्या ताब्यात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा कस लागणार आहे. कारण राज्यात महाविकास आघाडी होण्याच्या आधीपासूनच हा प्रयोग मालेगाव महापालिकेत झाला आहे, परंतु आता काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेल्या माजी आमदार आसिफ शेख आणि माजी महापौर रशीद शेख पितापुत्रांनी महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून, सर्व जागा राष्ट्रवादीतर्फे लढविणार असल्याचे रशीद शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करून टाकले आहे.
शिंदे गटाची भूमिका महत्त्वाची
मनपात स्थायी समिती सभापती असलेल्या शिवसेनेच्या निष्ठावंत राजाराम जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माजी निष्ठावंत शिवसैनिकांना बरोबर घेऊन भेट घेतली. मनपात ठाकरे गटातर्फे प्रमोद शुक्ला, रामा मिस्तरी, भरत पाटील, कैलास तिसगे, नथूबाबा जगताप, राजाराम जाधव, अनिल पवार, सुरेश गवळी हे कोण उमेदवार देतात आणि माजीमंत्री आमदार दादा भुसे कोणते उमेदवार मैदानात उतरवतात यावर पुढील राजकारणाचे चित्र स्पष्ट होईल. मनपात शिंदे गट स्वतंत्र लढतो की भाजपला बरोबर घेतो हे लवकरच समजेल. भाजपने तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी बैठक घेणे सुरू केले आहे.