नाशिकरोड : नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत संताप व्यक्त केला जात असताना त्यावर मीठ चोळण्याचा प्रकार शिंसमर्थकांकडून करण्यात येऊन गुरुवारी (दि.२४) मध्यरात्री शहरातील प्रमुख रस्ते व चौकात महापालिकेच्या दिशादर्शक फलकांवर शिंदे यांच्या समर्थनार्थ फलक बाजी करण्यात आली. परिणामी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नाशिक-पुणे महामार्गावरील डीजीपीनगर कॉर्नर सिग्नल येथील फलकाला काळे फासत जोरदार घोेषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला, मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. या बंडात नाशिक जिल्ह्यातील कृषिमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे हेदेखील सहभागी झाल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यातूनच निष्ठावान शिवसैनिकांनी शहरात फलकबाजी करून ‘आम्ही ठाकरे समर्थक’ म्हणून निर्धार केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राजकीय अस्थिरता असताना गुरुवारी (दि.२४) मध्यरात्री एकनाथ शिंदे समर्थक म्हणवून घेणाऱ्या योगेश म्हस्के, सुजित जिरापुरे या दोघांच्या नावे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शहरातील मध्यवर्ती बसस्थानक चौक, सातपूर, द्वारका आदी ठिकाणी महापालिकेच्या दिशादर्शक कमानीवर फलक लावले. सकाळी या फलकाविषयीचे वृत्त शिवसैनिकांना समजताच, सकाळी साडेदहा वाजता सैनिकांचा जत्था फलकांचा शोध घेण्यासाठी निघाले असता, तत्पूर्वीच बहुतांशी फलक काढून घेण्यात आल्याचे लक्षात आले. मात्र नाशिक-पुणेरोडवरील फेम सिनेमासमोरील कमानीवर फलक तसाच असल्याचे पाहून शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त करीत, त्यावर अंडे, काळा रंग फेकून विद्रुपीकरण केले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. सेनेच्या या आंदोलनाने नाशिक-पुणेरोडवरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिसांना या घटनेची खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना पिटाळून लावले. यावेळी सेनेचे योगेश बेलदार, अमोल सूर्यवंशी, राहुल दराडे, बाळू कोकणे, राजेंद्र क्षीरसागर, देवा जाधव, शोभा मगर, मंगला भास्कर, शोभा गटकळ, ज्योती नाईक, सचिन बांडे, उमेश चव्हाण, योगेश गांधी, गोकूळ नागरे आदी उपस्थित होते.
चौकट===
कोण हा म्हस्के?
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शहरात फलक लावणारा योेगेश म्हस्के हा शिंदे यांच्या वैद्यकीय आघाडीचा कार्यकर्ता असल्याचे समजते. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून तोदेखील शिंदे यांच्या समर्थनार्थ बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले. शिंदे यांच्या समर्थनार्थ फलक लावण्यासाठी होर्डिंग्ज कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले व त्यांनी परस्पर लावल्याचेही समजते.