---
आडगावला युवकाची आत्महत्या
नाशिक : आडगाव येथील शिंदे गल्ली परिसरात ३३ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. निशांत बाळकृष्ण कुमावत असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. निशांत यांनी घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
----
घरफोडीप्रकरणी अडीच वर्षांचा सश्रम कारावास
नाशिक : घरफोडी करून रोकड लंपास करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. शाह यांनी अडीच वर्षे सक्तमजुरी व ४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हसन हमजा कुट्टी असे आरोपीचे नाव आहे. राजवर्धन दिलीप नेरकर (२४, रा. दत्तनगर, पेठरोड) यांच्या किराणा दुकानात ४ ऑगस्ट २०१८ रोजी कुट्टी याने दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ७३ हजार ८०० रुपयांची रोकड हसनने लंपास केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ए. बी. कारंडे यांनी युक्तिवाद केला. आरोपी कुट्टीविरुद्ध परिस्थितीजन्य पुराव्यांद्वारे गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यास शिक्षा सुनावली आहे.
---
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा गौरव
नाशिक रोड : परिमंडळ-२मधील विविध पोलीस ठाण्यांमधील उत्कृष्ट कर्तव्य बजावत गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला.
पोलीस शरीरासोबत मनानेही निरोगी राहिल्यास त्यांची कार्यक्षमता व समर्पणवृत्ती वाढेल. कर्तव्यात यश मिळेल आणि त्याचा फायदा थेट समाजाला होईल. नागरिकांना चांगली सेवा पुरवायची असेल तर पोलिसांनी स्वत:चे शरीर आणि मन निरोगी कसे राहील, याकडे अधिक लक्ष द्यायला हवे, असा सल्ला या सत्कार सोहळ्यात पाण्डेय यांनी दिला. नाशिक रोड पोलीस ठाण्यातील सभागृहात बुधवारी सायंकाळी झालेल्या सोहळ्याला उपायुक्त विजय खरात, अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त समीर शेख, मोहन ठाकूर, अशोक नखाते, प्रदीप जाधव, दीपाली खन्ना आदी मान्यवर उपस्थित होते.