नाशिक : येत्या २३ ऑक्टोबरपूर्वी मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला असून, त्यासाठी मतदार याद्या व निवडणूक कार्यक्रमाची घोषणाही करण्यात आली आहे. सहकार खात्याच्या निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग यानिमित्ताने मोकळा झाला असून, कार्यक्रम जाहीर होताच, राजकीय हालचालींनी वेगदेखील घेतला आहे.
राज्यातील बहुतांशी बाजार समित्यांची पाच वर्षाची मुदत सन २०२० मध्येच संपुष्टात आली असली तरी, राज्यात कोरोनाचा कहर पाहता, सहकार विभागाने निवडणुका लांबणीवर टाकून संचालक मंडळांना मुदतवाढ दिली होती. काही बाजार समित्यांना दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आल्याने त्यातून तक्रारीही वाढल्या. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येऊन तिसऱ्या लाटेची शक्यताही मावळल्याने सहकार विभागाने निवडणुका घेण्यास अनुकूलता दर्शविली व त्यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
नाशिक जिल्ह्यात सतरा बाजार समित्या असून, त्यापैकी बागलाण व नामपूर बाजार समितीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे उर्वरित पंधराही बाजार समित्यांची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली आहे. सहकार विभागाच्या निर्णयानुसार २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदत संपणाऱ्या व त्यापूर्वी मुदत संपलेल्या सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी १० नोव्हेंबर रोजी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना असून, अंतिम मतदार यादी ६ डिसेंबर रोजी जाहीर करून १६ डिसेंबरपासून नामांकनास सुरुवात होईल. ७ जानेवारी २०२२ रोजी माघारी व १७ जानेवारीला मतदान घेण्यात येणार आहे.
बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर हाेताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, राज्यातील बदललेले राजकीय वातावरण पाहता, सत्ताधारी महाविकास आघाडी या निवडणुकीत एकत्र उतरते की, सहकार क्षेत्रावर आपले वर्चस्व ठेवून असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेस सेनेला त्यापासून दूर ठेवते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
चौकट===
या बाजार समित्यांची निवडणूक
नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा या बाजार समित्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.