घोटी : इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदानासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदान सामग्रीची जुळवाजुळव, मतदान केंद्र, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी दिली. रविवारी २४ मार्चला निवडणुकांसाठी मतदान घेऊन सोमवारी २५ मार्चला मतमोजणी होईल. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. इगतपुरी पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या असल्याची माहिती इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी दिली. निवडणूक होणाºया खडकेद, धार्णोली, देवळे, मालुंजे, बेलगाव कुर्हे, पाडळी देशमुख, समनेरे, कावनई, मुरंबी, नांदूरवैद्य, पिंपळगाव मोर, कांचनगाव, बोरटेंभे, आहुर्ली, मायदरा धानोशी, म्हसुर्ली, कोरपगाव, मांजरगाव, रायांबे, शेणवड बुद्रुक, सोनोशी, पिंपळगाव भटाटा, बारशिंगवे, खैरगाव, शेवगेडांग, इंदोरे, उभाडे, अधरवड, वाकी या गावांत ७७ मतदान केंद्रे आणि तेवढीच यंत्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. १० यंत्र राखीव ठेवण्यात येणार आहेत. ९२ मतदान केंद्राध्यक्ष, २७६ मतदान अधिकारी, ९२ इतर कर्मचारी असे ४६० जण नियुक्त करण्यात आले आहेत. २५ मार्चला सकाळी नवीन शासकीय इमारतीत मतमोजणी होणार असून त्यासाठी ९ टेबल आणि ९ फेर्या होतील. मतमोजणीसाठी २२ जणांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती खरमाळे यांनी दिली.
इगतपुरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:46 PM