नाशिक : विधानसभा निवडणुकीचा धुरळा बसत नाही तोच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील डिसेंबरमध्ये मुदत संपत असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यात नाशिक जिल्'ातील ७० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मतदारांनी नुकतेच विधानसभा निवडणुकीत मतदान केले असल्याने ग्रामपंचायतीसाठी डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्याची सूचना आयोगाने केली आहे. सोमवारी या निवडणुकीची घोषणा करून त्या-त्या ग्रामपंचायत हद्दीत निवडणूक आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. येत्या डिसेंबरमध्ये ज्यांची मुदत संपुष्टात येत आहे अशा ग्रामपंचायतींबरोबरच ज्या ग्रामपंचायतींच्या जागा काही कारणास्तव रिक्त झाल्या आहेत अशा ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्'ातील नाशिक, नांदगाव, येवला, निफाड, कळवण, बागलाण, देवळा, मालेगाव या आठ तालुक्यांतील सुमारे ७० ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या १ नोव्हेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असून, ३ ते ८ नोव्हेंबरदरम्यान नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. १० रोजी छाननी, १२ नोव्हेंबर रोजी माघार व २३ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशीच म्हणजे २४ रोजी मतमोजणी करण्यात येईल. अलीकडेच विधानसभा निवडणूक पार पडली असून, सर्वच मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या लढती झाल्या आहेत. गावेच्या गावे राजकारणात उतरल्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा राजकारण रंगणार आहे. मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्याची पद्धत असली, तरी अलीकडेच विधानसभा निवडणुकीत केलेल्या मतदानाची शाई ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे तर्जनीच्या शेजारील मधल्या बोटाला शाई लावण्यात यावी, अशा सूचना आयोगाने सर्वच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
७० ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर
By admin | Published: October 28, 2014 12:20 AM