नाशिक : वाचनालयाचे काळजीवाहू अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांच्या सूचनेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी वागत असल्याचा आरोप करत निवडणुकीतील पॅनल आणि त्यांच्या उमेदवारांकडून आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रकार शुक्रवारी पहावयास मिळाला. एकीकडे सार्वजनिक वाचनालयाचा प्रचार जोर धरू लागलेला असताना दुसरीकडे मात्र न्यायालयीन, धर्मादाय आयुक्तांकडील फेरे सुरूच असल्याने वाचनालयाच्या बाबतीत घडणाऱ्या घडामोडींध्ये रोज वेगवेगळे रंग बघायला मिळत आहेत. उमेदवारांकडून प्रचारादरम्यान होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांचा तिसरा अंक शुक्रवारी (दि. २४) वाचनालयात बघायला मिळाला. जनस्थान पॅनलच्या फलकावर ग्रंथमित्र पॅनलकडून आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर जनस्थान पॅनलनेही ग्रंथमित्र पॅनलची विविध मुद्द्यांवरून कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सुरुवातीपासून ग्रंथमित्र पॅनल आणि जनस्थान पॅनल यांच्यात होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये आता परिवर्तन पॅनलचीही भर पडली आहे. शुक्रवारी परिवर्तन पॅनलने वाचनालयात पत्रकार परिषद घेण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्याकडे विनंती केली असताना भणगे यांनी वाचनालयाच्या आवारात पत्रकार परिषद घेण्याबाबत स्पष्ट नकार दिलेला असतानाच जवळच उभ्या असलेल्या सुरेश गायधनी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना वाचनालयाच्या आवारात ग्रंथपालखी काढलेली चालते का? असा सवाल उपस्थित केला.भणगे यांनी या प्रश्नावर उत्तर देताना ग्रंथपालखी काढण्यापूर्वी ग्रंथमित्र पॅनलने निवडणूक अधिकाऱ्यांकडून तशी परवानगी घेणे आवश्यक होते असे सांगतानाच ग्रंथमित्र पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आपल्या अनुपस्थितीत झाल्याचे सांगून हा वाद इथेच मिटविण्याचा प्रयत्न केला परंतु जनस्थान पॅनलचे उमेदवार सुरेश गायधनी यांनी मात्र ग्रंथमित्र पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार विलास औरंगाबादकर यांच्याविरोधात शड्डू ठोकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये औरंगाबादकर यांनी खोटी तसेच बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर औरंगाबादकरांनी अध्यक्षपदाचा गैरवापर केल्याचा थेट आरोप अर्जाद्वारे केला असून, हा अर्ज ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शनिवारी (दि. २५) दाखल करणार आहेत. या अर्जात गायधनी यांनी औरंगाबादकरांचे असे वर्तन वाचनालयाच्या हिताचे नसून तत्काळ त्यांचा अध्यक्षपदाचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. वाचनालयाच्या निवडणुकीत दररोज वेगवेगळ्या आणि नाट्यमय घडामोडी घडत असल्याने निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत अजून काय काय घटना घडतात याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचीच कोंडी
By admin | Published: March 25, 2017 12:46 AM