मुदत संपुष्टात आलेल्या नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींकरिता निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम मागील आठवड्यात जाहीर केलेला आहे. त्यानुसार येत्या २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नाशिक महसूल विभागातील नाशिक जिल्ह्यातील ५२१, नगर ७६७, धुळे ५४१, नंदुरबार ८७ अशा २७९९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षकांच्या तसेच प्रत्येक जिल्ह्याकरिता समन्वयक अधिकाऱ्यांच्या नियुक्ती विभागीय आायुक्तांनी जाहीर केलेल्या आहेत.
आयुक्तांनी जाहीर केलेल्या निवडणूक निरीक्षकाकडे एक ते दोन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली असून विभागात एकूण ३७ निरीक्षकांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. निवडणुकीशी संबंधित सर्व कायदेशीर तरतुदी, नियम तसेच राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेले सर्व स्थायी आदेश आणि सूचनांचे पालन होत किंवा नाही याबाबतची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर देण्यात आलेली आहे. आचारसंहितेचे पालन करण्याच्या दृष्टीने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचनादेखील करण्यात आलेल्या आहेत. संबंधित निरीक्षकांना याबाबत कळविण्यात आले असून त्यांना निरीक्षक पदाचा पदभार सांभाळण्याबाबतचे कळविण्यात आले आहे.
दरम्यान, निवडणूक समन्वय अधिकारी म्हणून अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. महासूल विभागीय कार्यालयातील उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे नाशिक जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड आणि येवला या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे कळवण, मालेगाव, चांदवड, देवळा, बागलाण, नांदगावची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. धुळे जिल्ह्याची जबाबदारी उपायुक्त डी.डी. शिंदे, नंदुरबारसाठी उपायुक्त अर्जुन चिखले, जळगावसाठी उपायुक्त स्वाती देशमुख पाटील तर अहमदनगर जिल्ह्यासाठी सहायक आयुक्त कुंदनकुमार सोनवणे यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे.