सटाणा : पक्षीय राजकारणापेक्षा नातेगोते, जनसंपर्कावर भरनितीन बोरसे ल्ल सटाणायेथील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सगळ्याच पक्षांच्या तंबूमध्ये पळापळ सुरू असून, कोण कोणाचा आहे आणि अंतिमक्षणी कुठे राहील याचा कोणाला थांगपत्ता नाही असे असले तरी सर्वच पक्ष स्थानिक भाऊबंदकी, वाडा, नातेगोते आणि सर्व समाजाच्या घटकांशी नाळ याचा विचार करूनच इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे.पालिका निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, शिवसेना आणि शहर विकास आघाडी यांच्यात नगराध्यक्षपदाची लढाई अपेक्षित आहे. मात्र प्रभागातील उमेदवार शोधताना भाजपाव्यतिरिक्त सर्वच पक्षांना नाकेनऊ आले आहे. त्यामुळे प्रभागात सशक्त उमेदवार कुठून आणावा या विवंचनेत सगळेच राजकीय पंडित आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास एक दिवस बाकी आहे. मात्र आजच्या घडीला तरी भाजपाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांच्या भाजपा प्रवेशाने सर्वच समीकरणे बदलली आहेत. भाजपाकडे अध्यक्षपदासाठी डॉ. विलास बच्छाव, डॉ. संजय पाटील, सरोज चंद्रात्रे, साहेबराव सोनवणे, बाजार समितीचे सभापती रमेश देवरे नुकतेच पक्षांतर केलेले माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे या उमेदवारांची चर्चा आहे. मात्र पडद्याआड वेगळेच राजकारण शिजत आहे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला नामोहरण करण्यासाठी स्पर्धेत असलेल्या उमेदवारांमधील इलेक्टिव्ह मेरिट बघितले जात आहे. त्यातच ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी बाळासाहेब सोनवणे यांना भाजपा प्रवेश देऊन सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. एक शांत, संयमी राजकारणातील सर्वच घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून सोनवणे यांच्याकडे बघितले जाते. त्यांची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी पक्षश्रेष्ठींनी उमेदवारीचा शब्द दिल्याखेरीज प्रवेश झाला. यावरून तेच उमेदवार आहेत हे सिद्ध होत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून माजी आमदार संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, काका रौंदळ, माजी नगराध्यक्ष विजय वाघ हे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. परंतु बाळासाहेब सोनवणे यांच्या भाजपा प्रवेशामुळे त्यांच्या उमेदवारीचा आग्रह कितपत सशक्त आहे याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. माजी आमदार संजय चव्हाण यांनी राजकारणाशी कुठलाही संबध नसताना वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर दिग्विजय शहा यांना थेट अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी पायघड्या टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो अयशस्वी झाला. यामुळे या पक्षाला प्रभागामधूनदेखील तगडे उमेदवार शोधतांना दमछाक होताना दिसत आहे.
‘इलेक्टिव्ह मेरिट’च्या उमेदवारांचा शोध
By admin | Published: October 27, 2016 11:05 PM