घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या सभापती जया कचरे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने सभापतिपदाची जागा रिक्त आहे. नवीन सभापती निवडीसाठी येत्या १३ जानेवारीला निवडणूक होणार असून, सभापतिपद आदिवासी राखीव आहे. सभापतिपदाचा ‘तिळगूळ’ कुणाच्या हाती जाणार याकडे याबाबत राजकीय तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
इगतपुरी पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. सभापतिपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने गेल्या वर्षभरापूर्वी जया कचरे यांची निवड झाली होती. मात्र आवर्तन पद्धतीने त्यांना सभापतिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या राजीनाम्याच्या गेल्या महिनाभरापासून हालचाली सुरू होत्या.
दरम्यान, आठ दिवसांपूर्वी सभापती जया कचरे यांनी सभापतिपदाचा राजीनामा सादर केल्याने ही जागा रिक्त झाली. या सभापतिपदाच्या निवडीसाठी येत्या १३ जानेवारी रोजी पंचायत समिती सदस्यांची विशेष बैठक पंचायत समिती सभागृहात बोलावण्यात आली आहे.