नाशिक-नाशिकच्यामहापौरपदाचीनिवडणूक येत्या २२ नोव्हेंबर रोजी होणार असून विभागीय आयुक्तांनी तसे पत्र महापालिकेला दिले असून शनिवारपासून (दि.१६) अर्ज वितरण सुरू होणार आहे.
विधानसभा निवडणूकीमुळे राज्यातील महापौरांना तीन महिने मुदतवाढ मिळाली होती.मात्र २२ आॅगस्ट राजी राज्यशासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार तीन महिन्यात निवडणूका घेण्याचे आदेश असून त्याची माहिती मिळताच काल महापालिकेत धावपळ उडाली. महापौरपदाच्या निवडणूकीसाठी विभागीय आयुक्त हे पीठासन अधिकारी असतात, त्यानुसार त्यांच्याकडे निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यासाठी काल सायंकाळी प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार आज दुपारी विभागीय आयुक्तांनी २२ नोव्हेंबर हीच तारीख दिली असून सकाळी ११ वाजता निवडणूक होणार आहे.त्यासाठी उद्यापासून अर्ज वितरण सुरू होणार आहे. तर २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळात अर्ज स्विकारले जातील.
नाशिक महापालिकेत सध्या १२० नगरसेवक असून ६५ नगरसेवकांसह भाजपचे बहुमत आहे. मात्र शिवसेनेचे ३५ नगरसेवक असून राष्टÑवादी आणि कॉँग्रेसचे प्रत्येकी सहा असे बारा तसेच पाच मनसे, तीन अपक्ष आणि एक रिपाई आठवले गट असे एकत्र आले तर भाजपाला आव्हान देऊ शकतात. बहुमतासाठी ६१ नगरसेवक हवे आहेत. विरोधक एकत्र आले तर ही संख्या ५५ वर जाते. राज्यातील महाशिवआघाडीच्या धर्तीवर नाशिक महापालिकेत देखील महाशिवआघाडी तयार करून भाजपाच्या सात ते आठ नगरसेवकांना फोडण्याच्या हालचाली सुरू आहेत.