नाशिक : तीनवेळा स्मरणपत्रे, वारंवार दूरध्वनीवरून संपर्क करूनही महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्वच मान्यता प्राप्त राजकीय पक्षांसाठी राखून ठेवलेल्या प्रारूप मतदार याद्यांचे गठ्ठे अखेर शासकीय वाहनातून थेट राजकीय पक्षाच्या कार्यालयात जाऊन आदळावे लागल्यामुळे आगामी निवडणुकांबाबत सर्वच राजकीय पक्षांची असलेली उदासीनता यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या असून, या याद्यांमध्ये मतदारांची नावे योग्य आहेत किंवा नाही याची खात्री स्वत: मतदाराने यादी पाहून करण्याबरोबरच त्या त्या मतदारसंघाच्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांनीही यादीचे अवलोकन करून त्यातील त्रुटी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी अपेक्षा आयोगाची आहे. त्यामुळे मतदारांना प्रारूप मतदार याद्या पाहता याव्यात यासाठी त्या तहसील, प्रांत कार्यालयात तसेच काही ठराविक मतदान केंद्रांवरही ठेवण्यात आल्या आहेत.आयोगाच्या तरतुदीनुसार प्रत्येक राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या याद्या मोफत देण्यासाठी त्या जिल्हा निवडणूक कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने मान्यता प्राप्त राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्टÑवादी, कॉँग्रेस, महाराष्टÑ नव निर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, मार्क्यवादी कम्युनिष्ट पक्ष, भारतीय कम्युनिष्ट पक्ष व तृणमूल कॉँग्रेसचा समावेश आहे. जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी सदरच्या याद्या घेऊन जाव्यात यासाठी सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात नाशिक जिल्हा निवडणूक कार्यालयाने प्रत्येक पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना पत्र पाठविले, परंतु त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्यानंतर पुन्हा पुन्हा स्मरणपत्रेही रवाना करण्यात आली. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अधिकाºयांनी दूरध्वनीवरून जिल्हाध्यक्षांना संपर्क साधून प्रारूप याद्या घेवून जाण्याची गळ घातली. आज येतो, उद्या येतो या राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या आश्वासनाला भुलून अधिकाºयांनी महिनाभर वाट पाहिली. अखेर राजकीय पक्ष दाद देत नसल्याचे लक्षात येताच, निवडणूक अधिकाºयांनी चक्क शासकीय वाहनात मतदार याद्यांचे गठ्ठे टाकून ते प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यालयात जाऊन आदळली. यातून ना सत्ताधारी पक्ष सुटले ना विरोधक.
राजकीय पक्षांच्या उदासीनतेवर निवडणूक अधिकाऱ्यांचा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:36 AM