नाशिक- महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणूकीनंतर आता अन्य विषय समित्यांच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २० आॅक्टोबर रोजी होणा-या महासभेत यांसदर्भात सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर विषय समित्यांच्या समिती सभापतिपदाची निवड प्रक्रियाहोणार आहे.कोरोनामुळे राज्य शासनाने सर्व प्रकारच्या समित्यांच्या निवडणूकांना स्थगिती दिली होती. त्यामुळे प्रभाग समिती सभापतींबरोबरच महापालिकेच्या महिला व बाल कल्याण, विधी आणि वैद्यकिय व आरोग्य तसेच शहर सुधार समिती या चार समित्यांच्या निवड प्रक्रिया देखील स्थगित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर शासनाने आता आॅनलाईन पध्दतीने निवडणूका घेण्यास परवानगी दिल्यानंतर आता सर्व प्रथम प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी १५ आॅक्टोबर रोजी निवडणूका होणार आहेत.
त्यानंतर २० तारखेला प्रलंबीत विषय समित्यांच्या सदस्यांची निवडहोणार आहे. पक्षीय तौलनिक बळानुसार या चार विषय समितीच्या सदस्यांची निवड महापौर सतीश कुलकर्णी महासभेत घोषीत करतील. या विषय समित्यांमध्ये एकूण नऊ सदस्य असून यात भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन तर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकेक सदस्य नियुक्त करावे लागणार आहेत. समितीच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ मुळातच कमी असल्याने या समितीत्यांवर काम करण्यास कोणीहीही सदस्य फारसे उत्सुक नाही. त्यामुळे बळजबरी पदे देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.