नांदगाव : पालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजपाने स्वबळावर लढवाव्यात असा आग्रह कार्यकर्त्यांनी केल्याने याबाबत पक्ष पातळीवर विचार केला जात असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी दिली. तालुक्यातील हिसवळ येथील सरपंच-उपसरपंचासह स्थानिक विविध सहकारी संस्थेच्या अध्यक्षांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. नजीकच्या काळातील होऊ घातलेल्या पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र नस्तनपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. विधान परिषद निवडणुकीबाबत विचारविनिमय झाल्यावर बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पालीका निवडणूकीची चर्चा झाली. उत्तर महाराष्ट्राचे संघटनमंत्री किशोर काळसकर यांनी बैठकीला उपस्थितीत जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व पदाधिका-यांकडून कामाचा आढावा घेतला. चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील, प्रांतिक उपाध्यक्षा अँड. जयश्री दोंड, माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रकाश दायमा,आत्माराम कुंभार्डे, नंदकुमार खैरनार, दत्तराज छाजेड, राजाभाऊ पवार उपस्थितीत होते. रोहिणी आहेर, सुदाम आहेर, विलास आहेर, उपाध्यक्ष सविता आहेर यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. जिल्हा सरचिटणीस भावराव निकम यांनी सुत्रसंचालन केले.(वार्ताहर)
निवडणुका स्वबळावर लढा
By admin | Published: October 15, 2016 3:03 AM