नाशिक : मध्य प्रदेशचे विशेष पोलीस दलाच्या तीन तुकड्यांसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन प्लॅटून आणि राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्यांसह एक प्लॅटून, असा मोठा विशेष फौजफाट्यासह सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त पोलीस आयुक्तालय हद्दीत मतदानप्रक्रियेसाठी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.निवडणूक प्रचार कालावधी शांततेत पार पडल्यानंतर मतदानाचा टप्पा शहरात सर्वत्र अनुचित प्रकार न घडता पार पडावा यासाठी चोख बंदोबस्त पोलीस आयुक्तालयाकडून तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नांगरे-पाटील यांनी शनिवारी (दि.२७) पत्रकार परिषद पोलीस आयुक्तालयात घेतली. यावेळी त्यांनी महिनाभरात विविध पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या कारवायांचा लेखाजोखा सादर केला. निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात आचारसंहिता भंगाचा आयुक्तालय हद्दीत एक गुन्हा दाखल असून, गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पाच वेळा आॅलआउट, तर ३३ वेळा कोम्बिंग आॅपरेशन शहरात राबविण्यात आले. त्याचप्रमाणे ४२ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. तसेच बाहेरून आलेल्या १२ तडीपार गुंडांच्या मुसक्याही आवळण्यात आल्या आहेत. याबरोबरच मुंबई पोलीस कायदा, अमली पदार्थविरोधी कायदा, भारतीय हत्यार कायद्यान्वये सातत्याने कारवाई सुरू असून, आतापर्यंत १७ शस्त्र जप्त करण्यास पोलिसांना यश आल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांसह दारू विक्री, शांतता भंग करणाऱ्यांपैकी एकूण ६२ संशयितांविरुद्धकारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.४८ मतदान केंद्र संवेदनशीलपोलीस आयुक्तालय हद्दीतील चार मतदारसंघात एकूण एक हजार २१७ बूथ असून, त्यामध्ये १ हजार १०६ मुख्य, तर १११ अॅक्झिलरी बूथ आहेत. त्यापैकी ४८ बूथ संवेदनशील आहे. या बूथवर यापूर्वी निवडणूक काळात मतदानप्रक्रिया सुरू असताना कायदासुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला होता. यामुळे अशा बूथवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. कायदासुव्यवस्थेचा भंग करू पाहणाºयांची कुठलीही गय केली जाणार नसल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.असा आहे बंदोबस्तपोलीस आयुक्त : चार उपआयुक्त, नऊ सहायक आयुक्त, ४४ पोलीस निरीक्षक, १६० उपनिरीक्षक, २ हजार ५७५ पोलीस कॉन्स्टेबल, ६६६ गृहरक्षक दलाचे जवान, मध्य प्रदेश विशेष पोलीस दलाच्या तीन तुकड्या, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन प्लॅटून, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या व १ प्लॅटून, असा फौजफाटा असेल.
निवडणुकीसाठी अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:35 AM