नाशिक : महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारे बसची खरेदी करण्यात आली नसताना केवळ दक्षिणेतील एका शहरात नेली जाणारी बस तरण तलावाजवळ थांबवून त्यावर नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटीचा फलक लावून मार्केटिंग करणाऱ्या संबंधित कंपनीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.नाशिक महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी निविदादेखील मागविण्यात आल्या आहेत. यात इलेक्ट्रिक तसेच डिझेल आणि सीएनजी बसचा समावेश आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला सक्षम करण्याचे प्रयत्न असले तरी स्मार्ट सिटी कंपनीचा मात्र यात कोणताच संबंध नाही. दरम्यान, गुरुवारी (दि.२०) जेबीएम सोलर कंपनीची एक बस स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाजवळ थांबली, यावेळी त्यावर ‘नाशिक स्मार्ट सिटी विथ वर्ल्ड क्लास ट्रान्सपोर्ट’ असा फलक लावण्यात आला. त्यामुळे कंपनीच्या नावामुळे आणि फलकामुळे नाशिककरांचा गोंधळ उडाला. अनेक नागरिकांनी बसचे छायाचित्र काढून नाशिक महापालिका सोलरवर बससेवा सुरू करणार असून, त्यासाठी बस दाखल झाल्याच्या पोस्ट या बसच्या फोटोंसह सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला अनभिज्ञता दर्शविली. परंतु नंतर एका कंपनीने नाशिकमधून अन्य शहरात नेली जाणारी इलेक्ट्रिकची बस बघून घ्या, असे नमूद केल्याचे सांगण्यात आले. मात्र तरीही या बसने नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचा वापर कसा काय केला याबाबत शंका उपस्थित केली जात होती. तसेच अनेक प्रकारचे संशयदेखील व्यक्त होत होते. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संंबंधित कंपनीची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शुक्रवारी (दि.२०) दिले.संशयकल्लोळ टाळण्यासाठीच...सदरची बस ही राजस्थानमधून दक्षिणेतील एका शहरात चालली होती परंतु जाताना नाशिक महापालिकेसारखे ग्राहक मिळू शकते काय याची चाचपणी करण्यासाठी संबंधित कंपनीने मार्केटिंग केले आणि ते कंपनीला चांगलेच महागात पडले. मुळात स्मार्ट सिटीचा आणि बससेवेचा संबंध नाही. त्यातच निविदा मागविल्या असताना कोणत्या तरी कंपनीने परस्पर शहरात येऊन अशाप्रकारे कंपनीच्या नावाचा वापर केल्याने तो अधिक संशय निर्माण करणारा ठरला. संभाव्य वादाची नांदी लक्षात घेऊन त्यामुळेच महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या कंपनीवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
नाशकात इलेक्ट्रिक बसचे मार्केटिंग पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:40 AM