वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आणि कमी दाबामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. परिसरात मुबलक पाणी असूनही विजेच्या कमी दाबामुळे शेतीला पाणीपुरवठा करता येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. रात्री - अपरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.
वारेगाव परिसरातील वीज अपुरी किंवा गायब होण्याचे प्रकार सतत वाढत आहेत. हाता - तोंडाशी आलेल्या पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उभे पिके जळू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वारेगाव गावठाण परिसरातील रोहित्र तसेच मोकळं यांच्या शेतातील रोहित्रावर अतिरिक्त दाब वाढत असल्याने ही रोहित्र कायम निकामी होतात. या समस्येकडेही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
सातत्याने सुरू असलेल्या या प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या विजेच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. विजेच्या चाललेल्या गोंधळावर त्वरित तोडगा काढला नाही तर आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.