नाशिक : उन्हाची तीव्रता वाढत असतांना शहरात मात्र अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त आहे. शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत असताना विजेअभावी नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे याबाबत महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा करूनही शहरात असा प्रकार होत नसल्याचा पवित्रा या अभियंत्यांनी घेल्यामुळे रोष अधिकच निर्माण झाला आहे.दोन दिवसांपूर्वी नाशिकरोडमधील एका वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दोन ते अडीच तास नाशिकरोडचा वीजपुवठा खंडित झाला. त्यानंतरही या भागात अजूनही विस्कळीत वीजपुरवठा असून, खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नाशिक शहरातही सोमवारी दुपारपासून अनेकदा वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक भागांमध्ये जनरेटरचा वापर करावा लागला. सातत्याने जनरेटर सुरू करणे आणि वीजपुरवठा सुरळीत झाला की बंद करणे, अशी परेड करावी लागत होती.ग्राहकांना आपल्या कक्ष कार्यालयातच माहिती देण्याची व्यवस्था नसल्यामुळे ग्राहकांना कोणतीही माहिती मिळत नाही. तक्रार केंद्रे मुंबई स्थित आॅनलाइन केल्याने ग्राहकांचे समाधान होत नाही. यामुळे महावितरण आणि ग्राहकांमधील दरी वाढत आहे.महावितरणच्या कार्यालयात या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी अन्य एका अधिकाऱ्याला संपर्क साधण्यास सांगितले. संबंधित महाशयांना फोन केला असता कोणत्या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला, असा प्रतिप्रश्न त्यांनीच विचारला. सर्वकाही ऐकून घेतल्यानंतर त्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला दिला. टोल फ्री क्रमांकावरूनसंपर्क करूनही पलीकडील व्यक्तीला सर्वकाही माहिती आपणालाच द्यावी लागते. ग्राहकांच्या प्रश्नांबाबत नेहमीच उदासीनता दाखविली जाते. सोमवारीदेखील अनेकांना असाचा अनुभव आला.भारनियमन नसताना ‘वीज’गूलशहरात कुठेही भारनियमन नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला असला तरी वीजपुरवठा विस्कळीत होण्याचे मान्य करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडाचे प्रमाण वाढल्यामुळे काही भागांत वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. परंतु ग्राहकाला माहिती मिळण्याची व्यवस्थाच नसल्यामुळे ग्राहकांना मुकाटपणे वीज येण्याची वाट पाहावी लागते.
शहराला विजेचा झटका ; महावितरणच्या कारभाराविषयी संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 1:33 AM