नाशिक : अन्य राज्यातील विजेच्या दरांप्रमाणे महाराष्ट्रातही दर कमी असावे यासाठी शासनाने वीज नियामक आयोगाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, राज्यातील सर्व सामान्य नागरिक आणि उद्योजकांसह विविध घटकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व कृषी वीजजोडण्यांना तीन वर्षांत मीटर बसविण्यात येणार असून, त्यावर आधारित देयके दिली जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. १ जूनपासून हे दर लागू करण्यात येणार असल्याने चालू महिन्याच्या वीज देयकात नवीन दराचा बदल झालेला दिसेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, विद्युत कंपन्यांनी नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार वीज नियामक आयोगाकडे शासनानेही बाजू मांडली होती. त्यानुसार वीज नियामक आयोगाशी गेल्या तीन महिने झालेल्या चर्चेचे हे फलित आहेत. वीज कंपन्यांनी केलेली आठ हजार कोटी रुपयांची वार्षिक वाढ विविध मार्गांनी कमी करण्यात यश मिळाले आहेत. सर्वांत कमी दर असलेल्या वीज कंपनीकडून वीज खरेदी, कोळसा खरेदी तसेच अन्य मार्गातून गळती कमी करताना बचत करण्यात आल्याने हे शक्य झाले आहे. राज्यातील छोट्या वीज ग्राहकांना म्हणजेच ० ते १०० युनिट विजेचा वापर करणाऱ्यांना ४ रुपये १६ पैशांऐवजी ३ रुपये ७६ पैसे म्हणजेच ४० पैशांनी वीज स्वस्त होणार आहे. १०१ ते ३०० युनिटपर्यंत विजेचा वापर असणाऱ्यांना ७ रुपये ३९ पैशांऐवजी ७ रुपये २१ पैसे म्हणजेच १८ पैशांनी वीज स्वस्त मिळणार आहे.
तीन वर्षांत सर्व कृषी जोडण्यांना वीजमीटर
By admin | Published: June 28, 2015 1:43 AM