नाशिक : जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसने महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने सुचविलेल्या नवीन वीज दरवाढीच्या निषेधार्थ वीजबिलांची होळी करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या व वीज कंपनीच्या निषेधार्थ जोरदार घोेषणाबाजी करीत, वीजबिलांची होळी केली. आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले, त्यात म्हटले आहे की, वीज कंपनीने शेती पंपासाठी लागणाऱ्या विजेच्या दरात तसेच घरगुती वापरासाठी लागणाऱ्या विजेच्या दरात ३३ टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार वीज दरवाढ प्रस्तावित करून अन्याय करीत असल्याने ही दरवाढ मागे घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी कॉँग्रेस अधिक तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात माजी खासदार देवीदास पिंगळे, विष्णुपंत म्हैसधुणे, सोमनाथ खताळे, सचिन पिंगळे, अंबादास खैरे, प्रणीती बलकवडे, तानाजी गायधनी, गोरख बलकवडे, महेश भामरे, दीपक वाघ आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीकडून वीजबिलांची होळी
By admin | Published: July 17, 2016 12:47 AM