नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत असलेले सुमारे ११ हजार प्राथमिक शिक्षक व एक हजार शिक्षकेतर कर्मचारी असे १२ हजार शिक्षक व कर्मचारी मिळून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १५ हजार वृक्षांची लागवड करणार आहे. शिक्षण समितीच्या मासिक बैठकीत तसा ठराव संमत करण्यात आला.शिक्षण सभापती किरण थोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिक्षण समितीची बैठक झाली. बागलाण तालुक्यातील वाघाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एक चिंचेचे झाड असून, या झाडाच्या उत्पन्नातून शाळेच वीजबिल भरण्यात येत असल्याची माहिती संबंधित तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिली. याच माहितीचा धागा पकडून शाळांची वीजबिले भरण्यास मदत तर होईलच तसेच पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने चिंचेच्या झाडाची वृक्ष लागवड करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात प्रा.प्रवीण गायकवाड यांनी शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचारी मिळून १२ हजार कर्मचाऱ्यांनी १५ हजार चिंचेच्या वृक्षांची लागवड करावी, नुसतीच लागवड नव्हे तर झाडे जिवंत राहतील, याचा प्रत्येक मासिक बैठकीत अहवाल सादर करावा, पुढे या चिंचेच्या झाडाच्या उत्पन्नातून शाळांची वीजबिले भरण्यात यावी, असा ठराव प्रा. प्रवीण गायकवाड यांनी मांडला तो सर्व संमतीने मंजूर करण्यात यावा. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये यापूर्वी २७४ शाळांमध्ये सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्यात आली असून, आता ५५६ नवीन इंगजी शाळा सुरू करण्याबाबत बैठकीत मंजुरी देण्यात आली. एकाच आवारात जिल्हा परिषदेच्या शाळांना एकत्रित करण्याबाबत बैठकीत मंजुरी देण्यात आली. काही तालुक्यांत शाळांच्या एकत्रिकरणाला विरोध आहे. मालेगाव तालुक्यात काही शाळांमध्ये शिक्षक मद्यप्राशन करून येतात, अशा शिक्षकांचा तत्काळ अहवाल मागवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी बैठकीत सदस्यांनी केली. तसेच ज्या नव्याने ५५६ सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तेथे तातडीने नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात यावी, असा निर्णय बैठकीत झाला. बैठकीस प्रा. अशोक जाधव, माधुरी बोरसे, चंद्रकांत वाघ, शिक्षणाधिकारी रहीम मोगल आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चिंंचेच्या उत्पन्नातून भरणार शाळांची वीजबिले
By admin | Published: September 29, 2015 11:33 PM