नाशिक : शाळेची प्रथम सत्राची परीक्षा सुरू असताना वर्गावर अचानक वीज कोसळून दोन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे घडली़ यामध्ये दोन विद्यार्थी व एक विद्यार्थिनी असे तिघे भाजले आहेत. त्यांना हरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय आहे़ या विद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची लेखी परीक्षा सुरू असून, मंगळवारी दुपारच्या सुमारास नववी व दहावीचे विद्यार्थी पेपर सोडवित होते़ पेपर सुरू असताना आकाशात अचानक ढगांचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली़ यावेळी शाळेतील खोलीमध्ये पेपर सोडवित असलेले विमल सदू खानझोडे (१५, मूळ मु़ वरसईल, पो. खरवळ, ता़ त्र्यंबकेश्वर जि़ नाशिक), महेश नामदेव चौधरी (१५, मु़ निरगुडे, पो़ हरसूल, ता़ त्र्यंबकेश्वर जि़ नाशिक) व प्रवीण सुभाष घाटाळ (१६, रा़जातेगाव, ता़त्र्यंबकेश्वर, जि़नाशिक या तिघांवर अचानक वीज कोसळली़ शाळेतील वर्गावर वीज कोसळून भाजलेले विमल खानझोडे, महेश चौधरी व प्रवीण घाटाळ या तिघांना शालेय व्यवस्थापनाने तत्काळ हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, या तिघांवर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले़ दरम्यान, या तिघांना रुग्णालयात दाखल केलेले असले तरी जखमी विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकतो असा अंदाज येथील रहिवासी दत्तात्रय भोईर व अंबादास बेंडकोळी यांनी व्यक्त केला आहे़
शाळेमध्ये वीज कोसळून तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:33 AM