नाशिक : नोव्हेंबर २०१६ मध्ये देशपातळीवर लादण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका बसलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये गेल्या दीड वर्षापासून बंद पडलेल्या वीजबिल संकलन केंद्रे पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असून, यासंदर्भात बॅँकेने वीज वितरण कंपनीशी संपर्क साधून तयारी दर्शविली आहे. जिल्हा बॅँकेच्या २१२ शाखा कार्यरत असून, बँकेच्या १९४ शाखांमार्फत वीजबिल कलेक्शनचे कामकाज बँक करीत होती; परंतु सन २०१६ नोव्हेंबरपासून झालेली नोटाबंदी व उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे बँकेचे वीजबिल संकलनाचे कामकाज बंद झालेले होते. दरम्यानच्या काळात बँकेच्या जिल्हाभर सर्व दूर शाखांच्या ग्राहकांना वीजबिल भरणा करण्यासाठी इतरत्र जावे लागत असल्याने त्याची मोठी गैरसोय होत होती. त्यासाठी ग्राहकांना खर्चदेखील करावा लागत होता. त्यामुळे सदर सर्व ग्राहकांची सातत्याने बँकेकडे वीजबिल संकलन केंद्र सुरू करून होणारा खर्च, वेळ व गैरसोय दूर करावी अशी मागणी होत होती. सदर मागणीचा विचार करून बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून व आवश्यक तो प्रस्ताव नाशिकरोड व प्रकाशगड मुंबई येथे समक्ष प्रतिनिधीमार्फत दाखल केला असून, सदर कलेक्शन लवकर सुरू करावे म्हणून पाठपुरावा केलेला आहे. त्यास वीज वितरण कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
जिल्हा बॅँके च्या शाखांमध्ये लवकरच वीजबिल संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:24 AM