प्रभाग ९ मधील कार्बननाका परिसरातील भाजीबाजारात एका पान टपरीधारकाने महावितरण कंपनीकडून थ्री फेज विद्युत कनेक्शन घेऊन त्याद्वारे तेथील भाजीविक्रेत्या व्यावसायिकांना बेकायदा विद्युत पुरवठा देऊन दिवसाला शेकडो रुपयांची वसुली केली जात होती. त्यामुळे महावितरणची फसवणूक होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरणने त्या पान टपरीधारकाचे वीज मीटर जप्त करण्याची कारवाई केली आहे. केवळ विद्युत कनेक्शन बंद करून मीटर जप्त करण्याची कारवाई पुरेशी नाही. तर संबंधित व्यक्तीवर फसवणुकीचा आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. कोणाच्या आशीर्वादाने ही फसवणूक केली जात होती, याची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कार्यवाही करावी. अन्यथा महावितरणच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे पदाधिकारी साहेबराव जाधव, संतोष पवार, बाळा जारे, तुषार पाटील, सोनू काळे, प्रवीण इंगोले, विनोद जाधव, सचिन अहिरे, सुमित बच्छाव, उमेश काळे आदींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
(फोटो १७ वीज) पान टपरी चालकावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना देताना साहेबराव जाधव, संतोष पवार, बाळा जारे, तुषार पाटील, सोनू काळे, प्रवीण इंगोले, विनोद जाधव, सचिन अहिरे, सुमित बच्छाव, उमेश काळे आदी.