नाशिकरोड : नाशिक साखर कारखान्याचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने नासाकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नासाका कामगार युनियनने वीजबिल त्वरित भरावे व थांबलेली साखर विक्री करावी, या मागणीसाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. वाय. मोठे यांना बुधवारी सकाळी घेराव घातला होता. नाशिक साखर कारखान्याचे दोन लाख १७ हजार रुपयांचे वीजबिल थकल्याने गेल्या २० दिवसांपूर्वीच महावितरणने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला आहे. चार महिन्यांपूर्वीदेखील वीजबिल थकल्याने महावितरणने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला होता. तब्बल दोन महिन्यांनंतर वीजबिल भरण्यात आल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. पुन्हा २०-२२ दिवसांपूर्वी थकीत वीजबिलापोटी महावितरणने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे साखर कारखाना, कामगार वसाहत, कार्यस्थळ व कारखान्याचा संपूर्ण परिसर सायंकाळनंतर अंधारात बुडून जात आहे. कारखान्याच्या सुरक्षिततेबाबत संचालक मंडळ व व्यवस्थापन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने कारखान्याच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागण्यांसाठी घेरावनासाका कामगार युनियनच्या सदस्यांनी बुधवारी सकाळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. वाय. मोठे यांच्या घराबाहेर घेराव घातला होता. थकीत वीजबिल त्वरित भरण्यात यावे, तसेच १३ हजार साखर पोते विक्रीचे टेंडर व्यापाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यातील काही पोते साखर व्यापाऱ्यांनी उचलल्यानंतर गेल्या १०-१२ दिवसांपासून व्यापाऱ्यांनी साखर उचलणे बंद केले आहे. त्या व्यापाऱ्यांना त्वरित साखर पोते उचलण्यास भाग पाडावे, अशी मागणी नासाका कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली. यावेळी विष्णुपंत गायखे, शिवराम गायधनी, एकनाथ आगळे, बबनराव कांगणे, मधुकर गायधनी, शंकर रोकडे, मधुकर मुठाळ, मदन गायकवाड, पंडित सोनवणे, रमेश गुळवे, गोपाळ गायधनी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कारखान्याचा वीजपुरवठा ‘कट’
By admin | Published: February 05, 2015 12:15 AM