गेल्या अनेक दिवसांपासून सदर काम करणारा ठेकेदार उघड वीजचोरी करत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ पंचनामा करून संबंधित ठेकेदाराला तो जेव्हापासून खड्ड्यात साचलेले पाणी वीजपंपाच्या साहाय्याने बाहेर काढण्यासाठी वीजचोरी करत आहे, तेव्हापासून वीजबिल दिले जाणार असून त्याने सदर बिलाची रक्कम भरण्यासाठी टाळाटाळ केली, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वीज वितरण कंपनीमार्फत सांगण्यात आले. गंगाघाट परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. सदर कामासाठी खड्डे खणण्यात आलेले आहेत. खोदकाम केल्यानंतर त्या खड्ड्यात जमिनीतून निघणारे पाणी साचत असल्याने सदर ठेकेदार रोज वीजपंप लावून खड्ड्यात साचलेले पाणी बाहेर काढण्याचे काम करतो. मात्र, सदर पाणी वीजपंपाच्या साहाय्याने काढण्यासाठी वीज वितरण कंपनीचे वीजमीटर घेणे बंधनकारक असताना सदर ठेकेदाराने शक्कल लढवून वीज वितरण कंपनीचे मीटर न घेता थेट डीपीत वायर जोडून वीजचोरी केली. सदर प्रकार काही नागरिकांना पंचवटी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविला. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून पुढील कारवाईसाठी पंचनामा केला आहे.
स्मार्ट सिटी ठेकेदाराकडून विजेची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:13 AM